स्तनपानाच्या प्रमाणात वाढ


स्वतःला आधुनिक म्हणवणार्‍या महिला आपल्या मुलांना स्तनपान देत नाहीत. स्तनपानामुळे आपली फिगर बिघडते असा त्यांचा समज असतो. शिवाय ज्या महिला स्तनपान देत नाहीत त्या अधिक आधुनिक समजल्या जातात. परंतु गेल्या १०-१२ वर्षांपासून शासकीय पातळीवर स्तनपानाचे महत्त्व समजून देणार्‍या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या गेल्या आहेत आणि महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मोठी प्रबोधनाची चळवळ जारी ठेवली आहे. म्हणूनच अलीकडच्या एका पाहणीमध्ये गेल्या काही वर्षात स्तनपानाचे प्रमाण वाढले असल्याचे आढळून आले आहे. सुरूवातीच्या काळात मुलांना अंगावर पाजणार्‍या आणि स्तनपान मूल किमान सहा महिन्याचे होईपर्यंत जारी ठेवणार्‍या महिलांची संख्या वाढली असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या पाहणी दिसून आले आहे.

२००५ साली करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये स्तनपान देणार्‍या आणि ते आवडणार्‍या महिलांचे प्रमाण २३.४ टक्के एवढे होते. मात्र २०१५-१६ या वर्षात करण्यात आलेल्या पाहणीत हे प्रमाण ४१.६ टक्के असे वाढले असल्याचे दिसून आले. त्यातही महिलांचा समज असा झालेला आहे की मूल सहा महिन्याचे होईपर्यंत स्तनपान आवश्यक आहे. वास्तविक हा गैरसमज आहे. मुलाला वर्षभर तरी स्तनपान देण्याची गरज असते. पूर्वीच्या काळी तर दीड ते दोन वर्षांपर्यंत मुले स्तनपानावर राहत होती. परंतु स्तनपानाचे वय आपण कमी केले आहे आणि सहा महिने ही मुदत कसली तरी शास्त्रीय मुदत आहे असा समज करून घेतला आहे. त्यामुळे स्तनदा महिलांमध्ये सहा महिन्यांपर्यंत स्तनपान देणार्‍या महिलांचे प्रमाण ५४ टक्क्यांपर्यंत आहे.

मूल आजारी असले तरी किंवा स्वतः स्तनदा महिला आजारी असली तरी स्तनपानाला कसलीही बाधा येत नाही. म्हणून ही गोष्ट सांगण्याकरिता विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. कारण मुलाच्या किंवा स्वतःच्या आजाराच्या कारणावरून स्तनपान टाळण्याचे प्रमाण बरेच आहे. एकदा हा गैरसमज दूर झाला तर आजारी बालके आणि आजारी माता अशा दोन्ही प्रसंगांमध्ये मुक्तपणे स्तनपान होऊ शकेल आणि स्तनपानाचे प्रमाण या पेक्षा वाढलेले दिसेल. मुलाच्या आरोग्यासाठी स्तनपान आवश्यक असते. कारण मूल स्तनपानावर राहते तेव्हा त्याला कमी आजार होतात म्हणूनच मुलाच्या जन्मापासून सहा महिन्यापर्यंत केवळ आईच्या दुधावर राहिले पाहिजे असा डॉक्टरांचा आग्रह आहे. अगदी वरचे पाणीसुध्दा देण्याची गरज नाही.

Leave a Comment