लातूरचे आणखी एक रॅकेट


लातूर या शहराचे नाव काही ना काही निमित्ताने बातम्यांत येत आहे. गेला उन्हाळाभर लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. असा प्रकार पहिल्यांदाच होत असल्याने त्याची खूप चर्चा झाली. गेल्या महिन्यांत लातूरमध्ये परदेशातल्या काही लोकांशी संपर्क साधून देणारे छुपे आणि खाजगी टेलिफोन एक्स्चेंज उघड झाले. त्याचे संबंध देशातल्या काही अशाच केन्द्रांशी असल्याचे दिसून आले असून यामागे काही अतिरेक्यांचा हात होता काय याचाही तपास केला जात आहे. ही प्रकरणे गाजत असतानाच काल लातूर येथे मुलींची तस्करी करणारी टोळी उघड झाली आहे. वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली अविवाहित मुलींची नावे नोेंदून घेणे आणि त्यांचे विवाह लांबच्या लोकांशी लावून देऊन त्यातून पैसे कमावण्याचा हा धंदा आहे.

या रॅकेटची सूत्रधार ही कॉंग्रेसची कार्यकर्ती आहे आणि एका मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून तिच्यासह दहा जणांना अटक करण्यात आले आहे. देशाच्या काही भागात गरिबांच्या मुलींना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेश्या वस्तीत नेऊन विकण्याचे प्रकार ठावूक झाले आहेत पण लातूरचा हा प्रकार तसा नसावा असे दिसत आहे. या रॅकेटमागे लोकसंख्येतला मुला-मुलींच्या संख्येचा असमतोल हे कारण आहे. कारण लोकसंख्येतले मुलींचे प्रमाण एवढे कमी झाले आहे की काही जातींत लग्नाला मुली मिळणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लग्नात मध्यस्थी करणार्‍या वधू वर सूचक मंडळांकडून मुलींची नावे आणि पत्ते मिळावीत यासाठी त्यांना मोठ्या रकमांचे आमिष दाखवले जात आहे.

यातल्या काही मंडळांनी वर पित्यांची गरज ओळखून आणखी पाऊल पुढे टाकले आहे. मुलगी मिळवून दिल्यास वधू वर सूचक मंडळाची ठरलेली फी देण्यापलीकडे जाऊन काही रक्कम देण्यास वरांचे पालक सरसावले आहेत. मात्र त्यासाठी मंडळांच्या चालकांना मुलीला लग्नास राजी करण्याचाही प्रयास करावा लागतो. तो केल्यास आणि कसेही करून लग्न जमवून दिल्यास वरपित्यांकडून मिळणारी बक्षिसाची रक्कम काही लाखांत असते. राज्याच्या संपन्न भागांत वरपित्यांची अशी काही मजबुरी निर्माण झाली आहे की ते आपल्याला सून मिळावी यासाठी कितीही पैसा द्यायला राजी झाले आहेत. केवळ वधू वर सूचक मंडळ चालवून फार पैसा मिळत नाही मग अशा मार्गाने लाखो रुपये मिळतात असे दिसायला लागल्यामुळे मंडळांच्या संचालकांना मोह सुटायला लागला आहे आणि त्यातून असे प्रकार घडायला लागले आहेत. लातूरमध्ये हा प्रकार नवा आहे पण राजस्थान आणि हरियाणात ते सर्रास चालतात.

Leave a Comment