योग्यांचा आहार


कोणताही योगोपासक हा आहार आणि विहारात नेहमीच काही पथ्ये पाळत असतो. म्हणूनच त्याला आपले शरीर आणि मन यांतला समतोल साधता येतो. काय असतात ही पथ्ये आणि नियम ? रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी प्राशन करणे हा आहाराचा पहिला नियम असतो. असे पाणी प्याल्याने त्याच्या पोटातल्या रात्रभरात जमा झालेल्या आम्लावर उतारा केला जातो. सकाळी आम्ल आणि आल्कली यांचे संतुलन साधले जातेे. कोणताही योगोपासक हा आपले अन्न सात्विक असावा याबाबत आग्रही असतो. आपण आताच्या आधुनिक शास्त्रात अन्नाची विभागणी कर्बोदके, प्रथिने आणि मैद अशा तीन प्रकारात करतो पण आयुर्वेदात आणि योग शास्त्रात अन्नाचे तीन प्रकार मानले जातात. सात्त्विक, राजस आणि तामस.

सात्त्विक आहार हा मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हींच्याही शुद्धीकरणास मदत करतो. असा आहार साधा, हलका आणि पचण्यास सुलभ असतो. त्याची निवड करताना पर्यावरणाचा विचार केलेला असतो. त्यात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि उसळी यांचा समावेश असतो. त्यानंतर असतो राजस आहार. यात अंडी, लोणची, चहा, कॉफी आणि पित्तकारक पदार्थ असतात. हे पदार्थ उत्तेजक असतात. ते योगी आहारात टाळले जातात. तामस आहार हा माणसाला आळशी बनवणारा, पुन्हा पुन्हा गरम केलेला असतो. तो योगी आहारात बिलकुल वर्ज्य समजले जातात. योग्याचा आहार हा सात्त्विकच असतो.

योगी आहारात शिचवलेल्या अन्नापेक्षा निसर्गाने दिलेले अन्न न शिजवता, प्रक्रिया न करता तसेच त्यांचे स्वरूप न बदलता खावे लागते. कारण अन्नावर अग्नीचा संस्कार होतो तेव्हा त्यातले तंतुमय पदार्थ जळून जातात. बाजारातले तयार आणि प्रक्रियायुक्त पदार्थ तर योगोपासकाला एकदमच वज्यर्र् असतात कारण त्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. अशा अन्नातील सत्त्वांश कमी झालेले असतात. योगिक जीवनात खाण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व न खाण्याला म्हणजे उपवासाला दिलेले असते. खाण्याच्या वाईट सवयीमुळे पचन शक्तीचा र्‍हास होत असतो पण तो उपवासाने भरून काढता येतो. योगशास्त्रात त्याला लंघन असे म्हटले जाते. त्यात एकादशीसारखे जड पदार्थ खाल्ले जात नाहीत तर पोटाला पूर्ण विश्रांती देण्यासाठी अन्न पूर्ण बंद केलेले असते. या विश्रांतीमुळे पचनशक्तीला दिलासा मिळतो आणि तिची ताकद वाढते. अशा लंघनाच्या वेळी पाणी खूप पिले जाते.