प्रज्ञा स्वागतम


भारत ही तशी गुणवत्तेची भूमी पण आपल्या घरच्या गुणवत्तेची कदर आपल्याच देशात होत नाही. घरकी मुर्गी दाल बराबर. याच लोकांना परदेशांत चांगल्या संधी मिळता आणि चांंगले वेतनही मिळते. भारतातून परदेशात गेलेल्यांची संख्या जवळपास सव्वा दोन कोटी आहे. यातले काही लोक अभियंते आहेत तर काही मजूरही आहेत. असा हुशार लोक आपल्या देशातून बाहेर जाऊन तिथे आपल्या बुद्धीचा आविष्कार घडवून त्या देशाच्या विकासाला हातभार लावत असतील तर ते आपल्या देशाचे नुकसानच आहे. आपल्या देशातली बुद्धीमत्ता अशी बाहेर जाण्याला इंग्रजीत ब्रेन ड्रेन असे म्हणतात. ब्रेन म्हणजे मेंदू आणि ड्रेन म्हणजे गटार. याचा अर्थ असा की आपल्या देशातली गुणवत्ता बाहेर वहात चालली आहे. याला मराठीत नाव देण्यात आले प्रज्ञा पलायन.

१९८५ साली राजीव गांधी यांना असे समजले की अमेरिकेत १० हजार भारतीय विविध क्षेत्रातल्या संशोधनाच्या कामात गुंतलेले आहेत. राजीव गांधी यांना आपल्या देशाचे हे नुकसान सहन झाले नाही. त्यांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना अशा भारतीय शास्त्रज्ञांची बैठक घेतली आणि त्यांना भारतात परत येण्याचे आवाहन केले. परदेशात जाऊन नोकरी करण्यामागे त्यांचा ओढा का असेल? त्यांना वेतन जास्त असेल तर तेवढे वेतन भारतातही दिले जाईल असे आश्‍वासन राजीव गांधी यांनी दिले. असे असले तरी सर्वजणच काही आकर्षक वेतनासाठी परदेशी जात नाही. काही लोकांना तिथे संशोधनासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत असतात. त्यामुळेही ते परदेशात जात असतात.

राजीव गांधी यांनी त्याचेही आश्‍वासन दिले पण सॅम पिट्रोडा यांचा अपवाद वगळता एकही शास्त्रज्ञ भारतात परतायला तयार झाला नाही. तो काळ वेगळा होता. त्याला आता तीस वर्षे उलटली आहेत. आता भारतात सगळ्या सुविधा मिळत आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात फार मोठा फरक राहिलेला नाही. शिवाय मोदी सरकारने भारतात परत येणार्‍या शास्त्रज्ञांसाठी अनेक प्रकारच्या अभिनव योजना जाहीर केल्या आहेत. त्यांचा परिणाम होत असून गेल्या तीन वर्षात ३६७ शास्त्रज्ञांनी भारतात परत येऊन आपले संशोधन कार्य भारतात सुरू केले आहे. आपले शास्त्रज्ञ बाहेर जात होते त्याला आपण प्रज्ञा पलायन असे नाव दिले होते. आता ही प्रज्ञा परत येत आहे. या प्रक्रियेला आपण प्रज्ञा आगमन असे नाव द्यायला काही हरकत नाही. यातूनच भारताचे शास्त्रीय संशोधनातले योगदान वाढण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment