लष्कराचे यश


काश्मीरमध्ये मंगळवारी पहाटे झडलेल्या एका चकमकीत भारतीय सुरक्षा जवानांनी काश्मीरमधला सर्वाधिक धोकादायक अतिरेकी अबू दुजाना याला ठार केले आहे. तो लष्करे तय्यबा या दहशतवादी संघटनेचा काश्मीरचा प्रमुख होता. त्याचा खात्मा केल्यामुळे लष्कराच्या दहशतवाद विरोधी कारवाईला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्याभरात भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये अशारितीने अधिक धोकादायक अतिरेक्यांना संपवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर प्रश्‍न सोडवण्याच्या हेतूने एका निश्‍चित दिशेने वाटचाल करत आहेत.

केंद्र सरकारने काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्कराला दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भारतात घातपाती कारवाया करणार्‍या लष्करे तय्यबा या संघटनेचा काश्मीरमधील म्होरक्या अबु दुजाना याला यमसदनाला पाठवण्यात त्यामुळेच सुरक्षा जवानांना यश आले आहे. २०१४ सालपासून अबु दुजाना याचा पोलीस शोध घेत होते आणि त्याला सर्वोच्च महत्त्वाचा दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्याला जिवंत किंवा मृत पकडून देणार्‍याला १५ लाख रुपयांचे इनामही जाहीर झालेले होते. तो दोन वेळा पोलिसांच्या हाती सापडता सापडता बचावला. आज मात्र तो पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याच्या घराला वेढा दिला.

आपण आता पोलिसांच्या हाती पडणार याचा अंदाज येताच त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पण तो व्यर्थ ठरला. त्या घरामध्ये ज्या क्षणाला केवळ तीनच अतिरेकी आहेत याची खात्री पटली तेव्हा पोलिसांनी ते घरच स्फोटांनी उडवून दिले. त्यात अबू दुजानाचा मुडदा पडला. तो मुळात राहणारा गिलगिट बाल्तिस्तानचा होता. २०१० साली तो घुसखोरी करून काश्मीरमध्ये आला आणि लष्करे तय्यबाशी मैत्री करून त्याने काश्मीरच्या दक्षिण भागात दहशतवाद्यांचे नेटवर्क तयार केले. या भागातला त्याचा आधीचा कमांडर अबू कासीम हा एका चकमकीत मारला गेल्यानंतर अबू दुजाना हा प्रमुख झाला आणि आज तो मारला गेला आहे. दुजानाच्या मृत्यूच्या कारणाविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मुळात दुजाना हा लष्करे तय्यबाचा असला तरी या संघटनेत त्याच्या हुकूमशाहीमुळे असंतोष होता आणि कमांडर कोण व्हावे यावरून वाद होता. या वादातूनच त्याच्या नजिकच्या सहकार्‍यांनी त्याचा असा गेम केलेला असल्याचे काहींचे मत आहे.

Leave a Comment