अफूचा वापर वैध करण्याची मागणी


मादक द्रव्याच्या वापरावर आणावयाच्या बंधनांबाबत केन्द्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसींवर विचार करण्यासाठी झालेल्या मंत्रीगटाच्या बैठकीत केन्द्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मेेनका गांधी यांनी अफूचा वैद्यकीय वापर बंधनांतून मुक्त करावा अशी मागणी केली आहेे. अफू हे व्यसन मानले जाते आणि काही लोकांसाठी ते व्यसन आहेही पण मुळात अफू हे औषधी द्रव्य आहे म्हणून तिचा वैद्यकीय वापर हा वैध ठरवला जावा अशी मेनका गांधी यांची मागणी आहे. आज जगातल्या अनेक देशांत अफूचा वापर वैध झालेलाही आहे. त्यांचे अनुकरण करून भारतातही तशी पावले टाकली जावीत अशी मेनका गांधी यांची मागणी आहे. अमेरिका, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, झेक रिपब्लिक असे हे देश आहेत.

या देशांनी अफूच्या लागवडीवरील आणि वैद्यकीय वापरावरील बंधने काढून टाकली आहेत. अर्थात या देशातही अफूच्या वैद्यकीय वापराच्या आडून तिचा व्यसनांसाठीही वापर होतच असेल पण त्या निमित्ताने औषधी वापरासाठीची अफू सहज आणि मोकळेपणाने उपलब्ध होते ही बाब स्वागतार्ह आहे. अफगाणिस्तान मध्ये अफूचे मळे आहेत आणि तिथून ती अनेक मार्गांनी जगभर औषधी आणि व्यसन या दोन्ही वापरांसाठी पाठवली जाते. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था तर या मादक द्रव्यावर चालतेच पण तिचा वैध आणि अवैध मार्गांनी होणारा पुरवठाही अनेक देशांच्या अर्थव्यवहाराचा मोठा भाग व्यापून राहिलेला आहे.

अफूचा व्यसन म्हणून होणारा वापर आपल्याला प्रामुख्याने ठावूक असल्याने आपण तिला वर्ज्य समजतो. काही शेतकरी उसाच्या फडात हळूच काही अफूची झाडे लावतात. त्यांचा शोध लागल्यावर त्यांना कडक शिक्षा दिली जाते. असा हा व्यवहार चोरटा असल्यामुळे अफूचे दरही जास्त असतात पण त्यातली चोरी काढून टाकली तर अफू औषध म्हणून स्वस्तही मिळायला लागेेल. मात्र त्यासाठी तिच्या औषधी वापराची माहिती असायला हवी. अफूचे एकूण २३ प्रकारचे औषधी उपयोग आहेत आणि ते आधुनिक पद्धतीने संशोधन केल्यानंतर दिसून आलेले आहेत. त्यातले काही उपयोग तर फार कळीचे आहेत. कर्करोग, मेंदूचे विकार, श्‍वसनाचे विकार यात अफू औषधी स्वरूपात वापरली जाते. अनेक प्रकारांत अफूच्या वापराने मेंदूची क्षमता वाढलेली दिसली आहे तर काही प्रकारांत फुफ्फुसाची ताकद वाढलेली आढळली आहे.

Leave a Comment