ब्लू व्हेलवर बंदी


लहान मुलांना किंवा अपरिपक्व मनाच्या तरुणांना जीवघेणा ठरणारा ब्लू व्हेल हा गेम कायमचा बंद करण्याच्या दिशेने राज्य सरकार पावले टाकत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करून या गेमवर बंदी आणण्याचा निर्णय घेईल असे विधानसभेत जाहीर केले आहे. हा गेम खेळणार्‍या मनप्रित सहान या चौदा वर्षाच्या मुलाने मुंबईतील अंधेरीच्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार उघड झाल्यापासून राज्यात सर्वत्र त्याच्याविषयी चर्चा सुरू झाली आणि त्यातून या गेमची माहिती नसणार्‍यांना ती व्हायला लागली तेव्हा हे लोक नवी माहिती ऐकून अक्षरशः चक्रावून गेले.

हातात स्मार्ट फोन असल्यावर सतत काहीतरी बघण्याची, किंवा संदेश पाठवण्याची अथवा आलेले संदेश वाचण्याची चटकच मुलांना लागते आणि अशी चटक लागणार्‍या व्यक्तीला हातात मोबाईल नसेल तर क्षणभरसुध्दा चैन पडत नाही. त्यातही सतत एकच एक प्रकारची माहिती किंवा व्हिडीओज किंवा गेम्स पहावे लागत असतील तर अशा छंदिष्ट मुलांना वेड लागण्याची पाळी येते. मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये अशी बेचैन झालेली मुले उपचारार्थ दाखल होताना दिसायला लागली आहेत. कोणताही शास्त्रीय शोध हा माणसाच्या सोयीसाठी किंवा कल्याणासाठी लागलेला असतो. परंतु त्याचा वापर करण्याचे तारतम्य सुटले म्हणजे असे जीवघेणे खेळ सुरू होतात. स्मार्ट फोनचा वापर करून सेल्फी काढताना यावर्षी किमान २५-३० लोक तरी जीवास मुकलेले आहेत.

सतत मोबाईलशी खेळण्याची सवय लागलेल्या मुलांच्या मनःस्थितीचा गैरफायदा घेऊन ब्लू व्हेलसारखे खेळ किंवा गेम सुरू करण्यात आलेले आहेत. हा खेळ रशियात सुरू झाला आणि बघता बघता तो सार्‍या जगात पसरला आहे. त्या खेळामध्ये काहीतरी जबाबदारी दिलेली असते आणि एकेक अवघड जबाबदारी पार पाडत गेला की त्याला अधिक अवघड जबाबदार्‍या दिल्या जातात आणि एका क्षणाला अक्षरशः जीवघेणी जबाबदारी सोपवली जाते. त्यातच मुंबईतल्या या मुलाने आत्महत्या केलेली आहे. कारण त्याला त्याच्या गेममध्ये उंच इमारतीवरून खाली उडी मारण्याचा टास्क दिला गेला होता. जो माणूस हिप्नोटाईज होऊन आपल्या मनाची सूत्रे असे गेम सुरू करणार्‍यांच्या हातात सोपवतो तोच अशा गेममध्ये आपले नुकसान करून घेतो. मात्र आपण नेमके काय करत आहोत याचे भान त्याला नसते.

Leave a Comment