महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की: अण्णाभाऊ साठे


अशिक्षित असूनही असामान्य प्रतिभा आणि व्यक्त होण्यामागची जीवापाड तळमळ यामुळे लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे देशातच नव्हे तर विदेशातही एक साहित्यिक म्हणून मान्यता पावले. महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून असलेली त्यांची ओळख अगदीच मर्यादित आणि अण्णाभाऊंच्या प्रतिभेवर अन्याय करणारी आहे. कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आणि प्रामुख्याने लोकरंजन करणाऱ्या या लोककलेतून लोकजागरण करण्याचे महत्वपूर्ण कार्य अण्णाभाऊंनी केले. पोवाडे, लावण्या, गीत, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी मराठी जनतेत त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचे आहे. मात्र अण्णाभाऊंचे मोठेपण महाराष्ट्र आणि मराठीपुत्रातें मर्यादित नाही. त्यांच्या साहित्याने वैश्विक पातळीवर समाजातील वंचित घटकांच्या वेदनांना आवाज दिला. त्यामुळेच लौकिकार्थाने अशिक्षित असलेल्या या लोकशाहीराच्या साहित्याचा तत्कालीन प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या अनेक युरोपियन भाषांमध्ये अनुवाद झाला.

पिढ्यान पिढ्या शिक्षणाच्या आणि सुसंकृत जगण्याच्या सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी जीवापाड कष्ट सोसून आणि कुठल्याही शाळेत न जाता अनुभवाला गुरू मानून ते स्वतःच्या क्षमतेवर शिकले. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. लहानपणी सांगली जिल्ह्यातील वाटेगावपासून मुंबईपर्यंत चालत आलेल्या अण्णांनी नंतर केवळ कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार आणि कार्यकर्ता म्हणून ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चळवळीत अण्णाभाऊ सहभागी असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. त्यानंतर त्यांना मुंबई मुक्कामी त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक बैठक मिळाली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ‘लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. माटुंग्याच्या लेबर कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट’ होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली. याच काळात अण्णाभाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांचा स्तालिनग्राडचा पोवाडा त्या वेळी कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांच्यातला कलाकार बाहेर आणण्यासाठी हे पथक चांगलंच निमित्त ठरले.

१९४५ च्या दरम्यान लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले. १९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.

अण्णाभाऊंच्या साहित्यात ग्रामीण, दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. ना.सी. फडके आणि वि.स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्चवर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णाभाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे, फकीरा ही पुढे अतिशय गाजलेली कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. तर ‘वारणेच्या खोऱ्यात’ या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.

अण्णाभाऊ हे आपल्या कार्यक्रमाची सुरूवात परंपरेप्रमाणे गणेशवंदनेने न करता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे. तमाशात पारंपारिक श्रीगणेशा… अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय अण्णाभाऊंकडेच जाते. गवळण झिडकारून ‘मातृभूमिसह’ ‘शिवरायांना वंदन’ करण्याची परंपरा अण्णाभाऊनी रुजवली ती अशी….

“प्रथम मायभूमीच्या चरणा |
छत्रपती शिवाजी चरणा |
स्मरोनी गातो कवणा || ”

अण्णाभाऊंनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, रशियन, फ्रेंच, झेक आदी भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.

Leave a Comment