आंतरराष्ट्रीय बंदर होणार विजयदुर्ग


कणकवली – केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल.

त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल; तर दहा हजार थेट रोजगार संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

श्री. जठार यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन विजयदुर्ग बंदराबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दालनात नुकतीच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोर्ट ट्रस्ट, मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. विजयदुर्ग बंदर उभारणीवर यात शिक्‍कामोर्तब झाले. लवकरच विजयदुर्ग बंदर विकासाचा आराखडा या तीन कंपन्यांच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. पूर्णतः सरकारी असलेल्या या बंदराला केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार आहे.

ते म्हणाले, ३५३ हेक्‍टर जागा विजयदुर्ग बंदरासाठी लागणार आहे. विजयदुर्गसह गिर्ये आणि रामेश्‍वर येथील जागा संपादनासाठीची भूसंपादन प्रक्रिया त्यासाठी सुरू करण्यात आली. आवश्‍यक ती जागा बंदरासाठी ताब्यात येताच पुढील तीन वर्षांत बंदर उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या तीन ट्रस्टच्या माध्यमातून विजयदुर्ग बंदरासाठीची नवीन कंपनी तयार केली जाईल.

ते म्हणाले, गोवा आणि मुंबई येथील बंदरांमध्ये वाहतूक वाढविण्याला मर्यादा आल्यामुळे पुढील काळात देशात येणारा, तसेच देशातून जाणारा माल विजयदुर्ग बंदरातून आयात आणि निर्यात केला जाईल. याखेरीज, विजयदुर्गलगत होणाऱ्या रिफायनरी क्षेत्रासाठीच्या तेलसाठ्याची आयात विजयदुर्ग बंदर येथून होणार आहे. मोठमोठी जहाजे थेट बंदराला लागतील एवढी खोली विजयदुर्ग बंदराची आहे. सध्या असलेली १९ मीटर खोली वाढवून २५ मीटरपर्यंत केली जाईल.

Leave a Comment