वजन घटल्याने जगच बदलले


मुंबईतील चित्रपट कलावंत नितेश रंगलानी याने सातत्याने प्रयत्न करून आपले वजन ११४ किलोवरून ७५ किलोपर्यंत खाली आणले. आपण वृत्तपत्रातून आणि जाहिरातींमधून अशा प्रकारची वर्णने वाचत असतो. परंतु वजनामध्ये एवढा मोठा फरक करणार्‍या नितेशने वजन कमी करणे आणि कमी वजनसहीत जगणे यामुळे आपल्या भोवतीचे जग बदलल्यागत वाटत आहे अशी भावना व्यक्त केली. म्हणजे नितेश याच्यासाठी वजन कमी करणे ही केवळ शारीरिक कृती नसून ती मानसिक कृती आहे आणि तिचा आपल्या मनावर आणि भावनेवर चांगला परिणाम होत असतो. वयाच्या १८ व्या वर्षी एकदा तो एका मॉलमध्ये जाहिरात पत्रके वाटण्याचे काम करत होता. तेव्हा त्याच्यासमोर दोन सुंदर मुली येऊन उभ्या राहिल्या आणि त्यांनी नितेशला अंकल म्हणून हाक मारली.

वयाच्या पस्तिशी किंवा चाळीशीतसुध्दा कोणी आपल्याला अंकल म्हटले तर आपल्याला वाईट वाटते आणि कोणीतरी आपल्याला अंकल म्हणावे एवढे काय आपण म्हातारे झालो की काय असे आपल्या मनाला वाटून जाते. इथे तर नितेशला वयाच्या १८ व्या वर्षीच अंकल म्हणून हाक मारली गेली तेव्हा त्याला काय वाटले असेल याचा विचारही न केलेला बरा. त्याच्यासाठी ही घटना धक्कादायक ठरली आणि तीच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी खाण्यावर कडक बंधने घालायला सुरूवात केली. तो कॉलेजच्या मित्रांबरोबर कँटीनमध्ये दिसेनासा झाला. याची खूप चर्चा व्हायला लागली. मात्र केवळ खाण्यावर बंधने ठेवल्याने म्हणावे तसे वजन घटेना आणि याच काळाते ११४ किलोपर्यंत गेले. तो एका छोट्या हत्तीसारखा दिसायला लागला.

याच अवस्थेत त्याने वजन कमी करण्याच्या उपायांचा अभ्यास करायला सुरूवात केला आणि त्याला पहिल्यांदा मार्शल आर्टस्च्या क्लासची माहिती मिळाली. त्याने त्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे त्याचे वजन हळूहळू कमी व्हायला लागले. मात्र वजन कमी होण्याबरोबरच त्याच्या मनःस्थितीतही बदल व्हायला लागला. वजन कमी करण्याचा उत्साह वाढला आणि त्यासाठी त्याने रनिंग क्लबमध्ये भाग घेतला. त्यात पहिल्याच दिवशी तो ८ किलोमीटर पळाला आणि काही महिन्यात त्याचे वजन ८० किलोपर्यंत खाली आले. त्याचे खाणे आता फार साधे झालेले आहे. जंकफूड खाण्यापेक्षा सब्जी रोटी खाणे हे जास्त फायदेशीर आहे हे त्याच्या लक्षात आले. या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा दिनक्रम बदलला आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलून गेला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment