सकाळी नं. १ तर दुपारी नं. २


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रदीर्घ काळपासून बिल गेटस्चे नाव घेतले जात आहे. पण काल त्याला जेफ्री बेझोस याने मागे टाकले आणि त्याची मालमत्ता गेटस्पेक्षा जास्त झाल्यामुळे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे असे जाहीर करण्यात आले. बर्‍याच वर्षानंतर कोणातरी तरुण व्यक्तीने गेटस्ला मागे टाकले खरे परंतु बेझोसने पटकावलेला हा पहिला क्रमांक शेअर बाजारातल्या चढउतारामुळे त्याच्या मालमत्तेची तिथली किंमत वाढल्यामुळे आला होता. म्हणजे झाले असे की गुरुवारी सकाळी बेझोसच्या ऍमेझॉन डॉट कॉम या कंपनीच्या शेअर्सचे भाव वधारले आणि त्याच्या मालमत्तेची किंमत ९० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली. त्यामुळे तो जगातला क्रमांक एकचा श्रीमंत माणूस ठरला. परंतु त्याचे हे पहिल्या क्रमांकाचे स्थान शब्दशः औटघटकेचे ठरले.

शेअर बाजारातली उलाढाल सुरू राहिली आणि बेझोसच्या ऍमेझॉनचे शेअर्स दुपारच्या सत्रात कमी किंमतीला विकले गेले. त्यामुळे त्याच्या मालमत्तेची किंमत पुन्हा एकदा ९० अब्जाच्या खाली आली आणि तो पुन्हा दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत माणूस ठरला. मराठीमध्ये औट शब्दाचा अर्थ साडेतीन असा असतो. म्हणजे बेझोसचा पहिला क्रमांक साडेतीन तासच टिकला होता. म्हणून तो औटघटकेचा सर्वात श्रीमंत माणूस ठरला. अशा रितीने आजच्या जगामध्ये माणसाची श्रीमंती ही कशी काल्पनिक ठरायला लागली आहे. याचा अनुभव काल आला. गंमतीचा भाग म्हणजे बिल गेटस्प्रमाणे बेझोस हासुध्दा सामान्य कुटुंबातून पुढे आलेला धडपड्या उद्योगपती आहे.

बेझोसच्या आईचे वडील हे टेक्सास प्रांतातले बडे जमीनदार होते आणि त्यांच्याकडे २५ हजार एकर जमीन होती. परंतु बेझोसला तिचा काही फारसा फायदा झाला नाही. बेझोस न्यूयॉर्कमध्ये एका कंपनीत नोकरी करायला लागला. न्यूयॉर्कमध्ये एका कंपनीत तो व्हाईस प्रेसिडेंट झाला होता. तिथे त्याला इंटरनेटचा नाद लागला आणि त्याने इंटरनेटवरून पुस्तके विकण्याचा ऍमेझॉन डॉट कॉम हा उद्योग सुरू केला. पुढे त्याची व्याप्ती वाढवून ऍमेझॉनच्या माध्यमातून त्याने ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरू केला. ज्यातून तो जगातला सर्वात मोठा ई-कॉमर्सचा प्रणेता ठरला. त्याने ब्ल्यू ओरीजीन ही कंपनी स्थापन केली असून ही जगातली अंतरिक्ष प्रवास घडवणारी एकमेव खासगी कंपनी ठरणार आहे. बेझोस हा वृत्तपत्रे, माध्यमे आदी अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून प्रचंड श्रीमंत आहे.

Leave a Comment