सेल्फीचे वेड जाईना


आजची तरुण पिढी भ्रमिष्ट झाली आहे, अशी टीका नेहमीच मावळत्या पिढीचे लोक करत असतात. अनेक शतकांपासून हा प्रकार जारी आहे. परंतु प्रत्येकवेळी ही टीका योग्य असतेच असे नाही. सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर फोटो काढणे सोपे जात असल्यामुळे तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. पूर्वीच्या काळी फोटो काढणे हा दुर्मिळ प्रकार होता. अनेक लोक तर आयुष्यात एखादाच फोटो काढत असत. पुढे थोडीशी हौसमौज वाढली आणि समारंभाचे फोटो काढून त्याच्या स्मृती जतन करण्यास लोकांनी सुरूवात केली. मग लग्न, मुंज, बारसे अशा प्रसंगाचे फोटो निघायला लागले. पण आता त्यांच्या हातात स्मार्ट फोन आहे. ते लोक दररोजच फोटो काढायला लागले आहेत आणि स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या सोयीमुळे स्वतःचाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे.

अनेक तरुण मुले आणि मुली प्रत्येक वेळेला कपडे बदलले की त्या बदलाची सेल्फी काढतात. क्षणोक्षणी सेल्फी काढण्याची प्रकार नित्य आढळत आहेत. त्यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी त्यांची त्यांना काढायची आहे त्यामुळे त्यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही. परंतु त्यासाठीसुध्दा काही तारतम्य पाळले पाहिजे की नाही? आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे? मात्र सध्या रोज कोठे ना कोठे तरी सेल्फी काढताना तरुण किंवा तरुणी बुडून मरण पावली, वरून पडून मरण पावली, धबधब्यामध्ये सापडली असे कितीतरी प्रकार ऐकायला येत आहेत. सेल्फी म्हणजे असे काय आहे की ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये? ती प्राणाच्या पलीकडे आहे का?

गेल्या आठवड्यापर्यंत सेल्फी काढताना समुद्रात वाहून गेल्याच्या बातम्या ऐकत होतो. पण छंदिष्टपणाची कमाल म्हणजे एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि आता कर्नाटकामध्ये हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. ३० वर्षांचा हा मुलगा कर्नाटकातल्या बनेरघट्ट जंगलामध्ये पिकनिकसाठी गेला होता. फिरताना त्याला एक जंगली हत्ती दिसला. एरवीसुध्दा कोणता पर्यटक अशा हत्तीच्या जवळपास जायला बिचकतो. कारण शेवटी तो जंगली हत्ती असतो. परंतु या वेड्या तरुणाने हत्तीबरोबर सेल्फी काढण्याचा चंग बांधला आणि या नादात हत्तीच्या पायाखाली चिरडला जाऊन तो मरण पावला. गेल्या पंधरवड्यात नागपूरजवळ जलविहार करणार्‍या आठ जणांचा सेल्फी काढताना बुडून मृत्यू झाला आणि आता हा हत्तीचा प्रकार. विशेष म्हणजे दोन्ही प्रकारात हे पर्यटक प्रतिबंधात्मक आदेश मोडून आत गेले होते.

Leave a Comment