मोदींचा मार्ग मोकळा


लालूप्रसाद यादव यांचा मासा सीबीआयच्या गळाला लागला आणि नरेन्द्र मोदी यांचा २०१९ साली पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला. राजकारणातले डावपेच आणि विविध घटनांचे होणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम किती अगम्य असतात याचे प्रत्यंतर बिहारमध्ये आले. मोदी यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत फार देदिप्यमान विजय मिळवता आला नव्हता आणि २०१६ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तर चक्क पराभव झाला होता. भाजपाच्या हातात असलेली बिहारची युतीतली सत्ता चक्क गेली होती. डाव्या पक्षांनी आणि कॉंग्रेसने मिळून महागठबंधन स्थापन करून मोदींना पराभवाची चव चाखायला लावली होती. या पराभवाचा वचपा मोेदी यांनी काढला आहे. बिहारची ही महायुती तर आता मातीला मिळाली आहेच पण देशात अन्यत्र आणि विशेषत: उत्तर प्रदेशात तिला जिवंत करण्याचीही आशा मावळली आहे. महागठबंधन निर्माण करून नितीशकुमार यांंना मोदींचा पर्यायी नेता म्हणून पुढे आणण्याच्या कल्पनेला मुठमाती देत हेच नितीशकुमार आता भाजपा प्रणित रालो आघाडीत सामील झाले आहेत.

बिहारच्या महागठबंधनात मोदींनी छान फूट पाडली आहे. नाहीतर भ्रष्टाचारात लिप्त असलेले लालूप्रसाद वाचाळपणा करीत भाजपाला आसमान दाखवण्याच्या बाता मारायला लागले होते. त्यांनी रेल्वे मंत्री असताना किती पैसा खाल्ला आणि किती बेनामी मालमत्ता संपादित केल्या याची माहिती समोर ठेवून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची कुंडली समोर आली आणि नितीशकुमार यांना आपली स्वच्छ प्रतिमा सांभाळण्यासाठी लालूंच्या मुलांशी काडीमोड घ्यावा लागला आहे. लालू किती भ्रष्ट आहेत हे तर जगाला कळलेच पण आता हातातून सत्ता गेल्यामुळे चवताळलेल्या लालूंनी नितीशकुमार किती भ्रष्ट आहेत याचा पाढा वाचायला सुरूवात केली आहे. ते आणि नितीशकुमार हे किती भोंदू आहेत हे आता दिसायला लागले आहे. नितीशकुमार यांच्यावर खुनाचा आरोप आहे आणि त्यांना कधीही फाशीची सजा होऊ शकते त्यामुळे त्यांनी या शिक्षेतून सुटका करून घेण्यासाठी भाजपाशी युती केली आहे असा आहेर लालूंनी आपल्या या समाजवादी भाईला केला आहे. तो खरा की खोटा हे माहीत नाही पण लालूंच्या दृष्टीने तो खरा असेल तर असा आरोप असलेल्या नितीशकुमार यांच्या गळ्यात लालूंनी महागठबंधन बांधताना आपला गळा का घातला हा प्रश्‍न शिल्लक राहतोच. अर्थात असे अनेक प्रश्‍न आहेत पण या निमित्ताने दोन समाजवादी परस्परांवर आरोप करून भाजपाला फायदा करून देत आहेत ही गोष्ट अनेक समाजवादी भाईंच्या काळजाला इंगळ्या डसल्यागत डसत आहे.

बिहारमध्ये भाजपाला पर्याय देणारे महागठबंधन साकार होत असतानाच देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात काही पुरोगामी विचारवंत आणि लेखक विचारवंतांवर कथित हल्ले होत असल्याचा आरोप करून पुरस्कार वापसीची तद्दन ढोंगी मोहीम चालवत होते. बिहारच्या महागठबंधनाला आपल्या या मोहिमेची वैचारिक रसद मिळत असल्याच्या भावनेने या लोकांना गुदगुल्या होत होत्या पण आता या महगठबंधनाला मोदींच्या पर्यायाचे फळ येण्याच्या आतच त्याचा गर्भपात होत आहे हे बघून त्यांना पश्‍चात्ताप होत असेल. दोन समाजवादी कधी एकदिलाने नांदत नाहीत. तेव्हा ते दीर्घकाळ असे एकत्र राहून महागठबंधन कसे टिकवणार होते ? नितीशकुमार आणि लालूप्रसाद हे तर तब्बल २० महिने एका सरकारमध्ये राहिले हा समाजवादी पार्टीच्या इतिहासातला विक्रमच म्हणावा लागेल. ते २० महिने एका सरकारमध्ये होते पण एकदिलाने न नांदण्याचा वसा विसरलेले नव्हते. या २० महिन्यांत त्यांनी परस्परांना डिवचण्याचे अनेक प्रकार केले. त्याचीच परिणती आता या विच्छेदात झाली आहे. भ्रष्ट लालूंना आता खटल्यांना सामोरे जाताना सत्तेची कवचकुंडले उपलब्ध नाहीत.

१९८९ साली व्हीपी सिंग हे पंतप्रधान झाले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुलायमसिंग, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार हे चार नेते एकत्र काम करीत होते. पण त्यांना आपल्या जाती आणि राज्यातल्या सत्ता प्राप्त करण्याच्या कल्पना खुणवायला लागल्या आणि ते आता चार दिशांना फाकले आहेत. यातला नितीशकुमार आणि पासवान यांचा गट भाजपाच्या गळाला लागला आहे तर मुलायमसिंग यादव यांचा निम्मा गट भाजपाला वळचणीला येण्याच्या मन:स्थितीत आहे तर निम्मा गट मायावती तसेच राहुल गांधी यांच्या कच्छपी लागून उत्तर प्रदेशात महागठबंधनाचा प्रयोग करण्याच्या कामात गुंतले आहेत. म्हणजे उ. प्र. तसेच बिहारातल्या चार समाजवाद्यांपैकी अडीच समाजवादी भाजपाच्या आश्रयाला तर दीड समाजवादी सवतासुभा मांडण्याच्या कामात गर्क आहेत. नितीशकुमार आता भाजपाच्या साह्याने सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. खरे तर त्यांनी १९९८ पासून भाजपाशी मैत्री केली होती. ती छान चालली होती पण नरेन्द्र मोदी यांचा द्वेष करून ते भाजपापासून दूर गेले आणि नको त्या मार्गाला लागून फसले. आता पुन्हा ते भाजपाशी मैत्री करीत असून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न जाण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आता नरेन्द्र मोदी यांचा मार्ग मोकळा केला आहे.

Leave a Comment