विभाजनवाद्यांना धक्का


काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना बळ देणार्‍या विभाजनवादी नेत्यांवर सध्या मोठी कारवाई केली जात आहे. नोटाबंदीनंतर त्यांच्याकडे असलेल्या अर्थातच पाकिस्तानकडून मिळालेल्या बेहिशेबी संपत्तीचा खुलासा करता न आल्यामुळे हे नेते आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले असून त्यांना अटक करण्याचे सत्र जारी आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात नेत्यांना काश्मीर खोर्‍यात अशांतता निर्माण केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. काल शबीर शहा या मोठ्या नेत्याला अटक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून हे देशद्रोही नेते राज्यात अशांतता निर्माण करणार्‍या कारवायांना पैसा पुरवीत होते पण त्यांच्यावर एवढ्या व्यापक प्रमाणावर कारवाई झाली नव्हती. ती आता केली जात असल्याने राज्यातल्या अतिरेकी कारवायांचा पाया खचायला लागला आहे. ही चळवळ पूर्ण मोडीत काढणे आताच शक्य होणार नाही पण येत्या चार दोन महिन्यात काश्मीरच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल असा दिसायला लागले आहे.

अशी आशा वाटावी अशी स्थिती आहे कारण या अटकेने हे नेते आणि फुटिरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते अस्वस्थ झाले आहेत. ही अटक केवळ होऊन कारवाई थांबणार नाही तर या आणि अशा नेत्यांची पाळेमुळे खणून काढता येतील असे पुरावे गोळा करण्याचे काम जारी आहे. आजवर आपल्या कारवाया निभावून निघाल्या पण आता मोदी आपले समूळ उच्चाटण करणार अशी भीती या नेत्यांना लागून राहिली आहे. प्रत्यक्षात ते काहीच करू शकत नाहीत पण त्यांनी अटक होताच राज्यात बंद पाळण्याचा आदेश दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठा विभाजनवादी नेते सय्यद अली जिलानी याला आता घराच्या आत बसवून घरावर पहारा बसवण्यात आला आहे. त्याच्या विरोधात ३० मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. हाच तो नेता आहे ज्याला भेटायला कॉंग्रेसचे काही नेते गेले होते आणि त्याच्या घरी तो भारत सरकारवर काही टिप्पणी करीत असताना त्याचा निषेध क़रण्याऐवजी दात विचकून हसत होते. या कॉंग्रेस नेत्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी राजकारणाला नेहमी आडवे येणारे मणिशंकर अय्यर यांनी केले होते. या गिलानीला कोणत्या क्षणी अटक होईल हे सांगता येत नाही पण त्याच्या जावयाला सध्या अटकेत टाकण्यात आले असून त्याच्यावर पाकिस्तानकडून पैसा घेण्याच आरोप लावण्यात आला आहेे. त्याचे पुरावेही गोळा करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे.

काश्मीर मधील काही स्वयंसेवी संघटनाही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या संघटना हुरियत कॉन्फरन्सशी निगडित आहेत. भारत – पाकिस्तान सीमेवरून चोरट्या मार्गाने व्यापार करणार्‍या काही व्यापार्‍यांनाही झटका बसला आहे. त्यांच्यावर तर गेल्या काही महिन्यांपासून पुरावे गोळा केले जात होते. हे व्यापारी पाक व्याप्त काश्मीरमधील अनेक वाटांचा वापर करून पाकिस्तानशी बेकायदा व्यापार करीत होते. या सगळ्यांना अटक करून दिल्लीत आणण्यात आली आहे. या लोकांवर दाखल झालेले गुन्हे आणि दगडफेकीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज यांचा अभ्यास करण्यात आला आहे कारण याच लोेकांकडून पैसे वाटून दगडफेक केली जात होती. हे फुटिरतावादी नेते हिजबुल मुजाहेदीन या संघटनेशी हातमिळवणी करून काश्मीर खोर्‍यात अशांतता निर्माण करीत असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. सर्वात मोठी कारवाई म्हणजे जेकेएलएफचा नेता यासीन मलिक यालाही अटक करण्यात आली आहे. केन्द्र सरकार या अशांततेवर जालीम उपाय योजण्याच्या निर्धाराने कामाला लागले असल्याची ही लक्षणे आहेत आणि त्यामुळे काश्मीरमधील गोंधळ कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काल केन्द्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक राजीव राय भटनागर यांनी राज्यातल्या त्यातल्या त्यात काश्मीर खोर्‍यातल्या स्थितीची माहिती दिली. २०१७ मध्ये सुरक्षा जवान आणि पोलिसांवर दगडफेक करण्याचे प्रकार २०१६ पेक्षा तिपटीने कमी झाले आहेत असे भटनागर यांनी सांगितले. २०१६ मध्ये दगडफेकीचे असे प्रकार दररोज घडत असत पण आता आपल्याला अशा बातम्या कमी ऐकायला मिळत आहेत. संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी काल लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला, काश्मीरच्या सीमेवर होणार्‍या घुसखोरीच्या प्रकारांवर आक्रमकपणे कारवाई करण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत अशी माहिती दिली. यावर्षी सीमेवर घुसखोरीचे ८० प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. या कारवाईत ३२६ अतिरेकी ठार झाले आहेत आणि फार कमी अतिरेेकी भारतात घुसू शकले आहेत असे मंत्र्यांनी सांगितले. एवढे प्रयत्न हाणून पाडणे आणि अतिरेकी ठार होणे प्रथमच घडत आहे. याचा परिणाम आपल्याला प्रत्यक्षात जाणवतही आहे. सीमेवर चकमकी सुरू आहेत पण देशाच्या आतील भागात कोठे तरी अतिरेक्यांनी घातपाती कारवाई करून गोंधळ माजवला आहे असे प्रकार २०१७ मध्ये जवळपास घडलेलेच नाहीत. कारण दहशतवाद्यांच्या हालचालीवर गुप्तचर यंत्रणा बारकाईने नजर ठेवून आहेत. त्यांची नांगी ठेचली जात आहे.

Leave a Comment