पहिल्याच भाषणाने आशा वाढली


भारताचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाच्या सद्सद्विवेकबुध्दीचे रक्षक म्हणून मोठ्या मानाच्या पदाववर आरूढ होत आहेत. ते या पदाला न्याय देतील की नाही असा शंकेचा सूर अनेकदा व्यक्त झालेला आहे. परंतु आपल्या विषयी व्यक्त करण्यात आलेल्या सार्‍या शंकाकुशंका व्यर्थ आहेत हे नव्या राष्ट्रपतींनी केवळ आपल्या पहिल्या भाषणातूनच पुरेपूरपणे दाखवून दिले आहे. त्यांच्या भाषणाविषयी विविध क्षेत्रात उमटलेल्या प्रतिक्रियांचा विचार केला असता असे लक्षात येते की केवळ एका भाषणाने लोकांच्या मनाचा ठाव घेण्याचा हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातला पहिलाच प्रकार आहे. त्यांचा शपथविधी काल पार पडला. या शपथविधीनंतर ते काय भाषण करतात याकडे केवळ भारतातल्या लोकांचेच नव्हे तर सार्‍या जगातल्या लोकांचे डोळे लागले होते. कारण या पदासाठी त्यांचे नाव जाहीर झाल्यापासून अमेरिकेतल्या आणि ब्रिटनमधल्या वृत्तपत्रांनी आपापल्या मगदुराप्रमाणे आणि भारताविषयीच्या त्यांच्या आकलनाच्या पातळीप्रमाणे काही टिप्पणी केलेली होती.

त्यामध्ये हिंदू अतिरेकी संघटनेचा नेता भारताचा राष्ट्रपती होत आहे असे आवर्जुन म्हटले गेलेले होते. अशा प्रकारचे संबोधन भारताच्या राष्ट्रपतींच्या बाबतीत करणे ही गोष्ट सामान्य नव्हे. तिच्यातून अनेक प्रकारचे अर्थ स्पष्ट होत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक भारताचा राष्ट्रपती होत आहे त्यामुळे या देशाची घटना आणि लोकशाही यांच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचे पर्व सुरू होणार आहे असे सूचित करण्याचा हेतू त्या टिप्पणी मागे होता. परंतु रामनाथ कोविंद यांनी या सगळ्यांच्या दुष्ट अपेक्षांना शह देऊन आपण कोणत्या गांभीर्याने देशातले सर्वोच्च पद स्वीकारत आहोत हे आपल्या पहिल्याच भाषणात दाखवून दिले. आपण भाजपाचे कार्यकर्ते असलो तरी राष्ट्रपती झाल्यानंतर आपला त्या पक्षाशी असलेला संबंध संपुष्टात येईल आणि आपण १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या सर्वोच्च पदाचे मानकरी म्हणजे सव्वा अब्ज जनतेचे प्रतिनिधी होणार आहोत हे त्यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा भारतीय घटनेमागच्या विचारधारेशी विसंगत असल्याचे सांगितले जात असले तरी जेव्हा संघाचा एखादा स्वयंसेवक घटनात्मक पदावर बसेल तेव्हा तो घटनेमागच्या विचारधारेशीच आपले इमान राखील असे रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केले.

म्हणून त्यांनी आपल्या भाषणात संघाच्या संस्थापकांचा उल्लेख न करता भारताच्या इतिहासात ज्यांना सर्वमान्य नेते मानले गेले त्या महात्मा गांधींचा आणि घटनाकार म्हणवल्या जाणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदराने उल्लेख केला. या गोष्टी रामनाथ कोविंद यांच्याविषयी असलेला आदर वाढवण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही काल निरोपाचे भाषण देताना आपल्या विचारांची जी उंची दाखवली होती तिच्याशी साम्य राखणारीच उंची नव्या राष्ट्रपतींनी आपल्या उद्बोधक भाषणातून दाखवून दिली. भारताच्या लोकशाहीकडे सार्‍या जगाचे लक्ष आहे. ही लोकशाही टिकते की नाही, कशी चालते आणि तिच्यात निर्माण होणारे विविध प्रवाह कसे आहेत या विषयी सार्‍या जगाला प्रचंड उत्सुकता आहे. कारण ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. तिसर्‍या जगातील अनेक देश भारताकडे मार्गदर्शक म्हणून बघत असतात. त्यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचे स्तंभ म्हणवणार्‍यांनी कोणतीही कृती करताना, सारे जग आपल्याकडे बघत आहे याचे भान ठेवले पाहिजे.

नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणामध्ये हे भान ओतप्रोत भरलेले होते. आपल्या देशातल्या लोकशाहीमध्ये अनेक प्रकारचे वाद झाले. सगळ्या प्रकारची मते व्यक्त केली गेली. हा शपथविधी समारंभ ज्या सेट्रल हॉलमध्ये होत आहे तिथे जमून भारताच्या खासदारांनी अनेकदा निरनिराळी मते व्यक्त केली. परंतु मते विविध असली तरी सर्वांची मने एक आहेत हेच आम्ही जगाला दाखवून दिले. या गोष्टीवर राष्ट्रपतींनी चांगलाच भर दिला. आमच्या लोकशाहीने विविधतेतील एकता नेहमीच जगाला दाखवून दिली आहे. हे तर राष्ट्रपतींच्या भाषणाचे सुरेख सूत्र होते. देशात कितीही वाद झाले तरी आम्ही या देशातल्या जनतेला नेहमीच सर्वोच्च मानलेले आहे आणि म्हणूनच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्र निर्माते कोणाला म्हणावे याची फार चांगली व्याख्या भाषणातून मांडली. या देशाचे रक्षण करणारे जवान, या देशात धान्य पिकवणारे शेतकरी, कारखान्यात राबवणारे श्रमिक आणि देशातली १२५ कोटी जनता ही राष्ट्र निर्माती आहे हे राष्ट्रपतींचे प्रतिपादन खरोखरच त्यांच्या विषयीचा आदर वाढवणारे ठरले आहे. राष्ट्रपती हे सरकारच्या सद्सद् विवेकबुध्दीचे रक्षक असतात आणि देशाची संस्कृती, परंपरा तसेच लोकशाहीत निर्माण झालेले िवविध आदर्श मानदंड कायम ठेवून देशाचा गाडा ठिक हाकला जात आहे की नाही यावर त्यांचे नैतिक नियंत्रण असते. रामनाथ कोविंद हे या सार्‍या गोष्टींचे भान राखतील आणि राज्यकर्त्यांना हे भान देतील असा विश्‍वास त्यांच्या पहिल्याच भाषणातून व्यक्त झाला आहे.

Leave a Comment