ड्रग रॅकेटचा विळखा


हैदराबाद शहर आणि परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या मादक पदार्थांच्या विक्रीच्या कारस्थानाला आता व्यापक स्वरूप असल्याचे उघड दिसायला लागले आहे. आजपर्यंत या प्रकरणात १९ जणांना अटक करण्यात आली असून २८ जणांची चौकशी झालेली आहे. मादक पदार्थ विरोधी दलाने एलएसडी, एमडीएमए, कोकेन आणि अन्य मादक पदार्थांचे मोठे साठे हस्तगत केले आहे. त्यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे. हे लक्षात येते. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेता रवी तेजा, नंदू आणि अभिनेत्री चर्मेकौर आणि मुम्मैत खान या चौघांचा चौकशी झालेल्या समावेश असल्यामुळे तर फार खळबळ माजली आहे. त्यांच्याबरोबरचच अभिनेता तरुण, शुभराजू, दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि तंत्रज्ञ शाम नायडू यांनाही पूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

या रॅकेटमध्ये समाविष्ट असलेल्या आरोपींच्या फोन क्रमांकांची छाननी केली असता त्यात आढळलेली नावे धक्कादायक ठरली आहेत. मागच्या आठवड्यात या संबंधात सुप्रसिध्द दिग्दर्शक धर्मा राव यालाही ताब्यात घेतले होते. त्याच्या पाठोपाठ पी. नवदीप हाही अभिनेता चौकशीच्या जाळ्यात सापडला. चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले एवढे नामवंत तंत्रज्ञ आणि अभिनेते मादक पदार्थांच्या चोरट्या व्यापारात गुंतलेले असावेत ही बाब मोठीच धक्कादायक मानली जात आहे. या प्रकरणातली सर्वात धक्कादायक घटना म्हणजे काजल अग्रवाल या नामवंत अभिनेत्रीच्या व्यवस्थापकाला झालेली अटक. चित्रपटसृष्टीतल्या वर उल्लेख केलेल्या सर्व तंत्रज्ञांच्या आणि अभिनेत्यांच्या केवळ चौकशा झालेल्या आहेत. परंतु काजल अग्रवालच्या मॅनेजरला मात्र थेट अटक झालेली आहे.

तिचा व्यवस्थापक म्हणवणारा हा पुत्तकार रोन्सन जोसेफ याची या प्रकरणातली गुंतवणूक अधिक खोलवर जाणारी असल्यामुळे त्याला थेट अटक झाली आहे. या अटकेनंतर जोसेफ याच्यापेक्षाही काजल अग्रवाल अधिक अडचणीत आली. कारण या रॅकेटमध्ये जोसेफच्या माध्यमातून खुद्द काजल अग्र्रवालच या रॅकेटमध्ये गुंतले आहे की काय असा प्रश्‍न विचारला जायला लागला. मात्र तिने हात झटकले आहेत. जोसेफ हा माझा व्यवस्थापक होता परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काही संबंध नाही आणि त्यांच्या त्या उद्योगांवर माझे नियंत्रण असल्याचा प्रश्‍नच नाही, असे तिने स्पष्ट केले आहे. जोसेफला मनिकोंडा येथे अटक करण्यात आली आणि तेव्हा त्याच्या घरातून काही मादक पदार्थ जप्त करण्यात आले. ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.

Leave a Comment