विनाशकारी ड्रग रॅकेट


हैदराबाद शहरात चालणार्‍या नशिल्या पदार्थांच्या आणि मादक द्रव्यांच्या चोरट्या व्यापाराच्या कथा आता बाहेर यायला लागल्या असून हे रॅकेट किती व्यापक आणि म्हणूनच किती विनाशकारी आहे याची कल्पना यायला लागली आहे. सुरूवातीला या कारस्थानातल्या काही लोकांना अटक झाली आणि त्यांचा तपास केला तेव्हा हैदराबादचा एक उद्योगपती आणि माहिती तंत्रज्ञानात कामाला असलेला एक तंत्रज्ञ त्यात सहभागी असल्याचे आढळले. यातला तंत्रज्ञ तर अभियंता असून तो एक वर्ष अमेरिकेतल्या प्रतिष्ठित अशा नासा या संघटनेत अंतराळ संघटनेत काम करून आला आहे असे समजले. हे दोघे या केवळ व्यसनात गुंतलेले नव्हते तर व्यापारात गुंतलेले होते. या व्यापारासाठी ते अत्याधुनिक संवाद साधनांचा वापर करीत होते.

या दोघांना पकडून चौकशी केल्यावर या रॅकेटमध्ये अनेक मान्यवर गुुंतले असल्याचे दिसायला लागले असून त्याची चौकशी आता उच्च पातळीवरून सुरू झाली आहे. आपल्या देशात जेव्हा अशी कारस्थाने उघड झाली तेव्हा त्यांचे मूळ नायजेरियात असल्याचे दिसून आले. आताही या सार्‍या रॅकेटचा सूत्रधार एक नायजेरियनच असल्याचे दिसून आले आहे पण या व्यापारात येणारे मादक पदार्थ यूरोपातल्या काही देशांतून येत होते असेही दिसायला लागले आहे. या व्यापारात चित्रपट सृष्टीतलेही काही कलाकार गुंतले आहेत आणि त्यातल्या १३ जणांना ताब्यात घेतले आहे. तेलंगणाच्या मादक द्रव्य विरोधी सक्त अंमलबजावणी खात्याकडे आता या प्रकाराचा तपास सोपवला आहे.

या दलाचे प्रमुख अकून साबरवाल यांना दोन दिवसांपासून कोणीतरी खुनाच्या धमक्या देत आहे. एवढ्या वरिष्ठ अधिकार्‍याला धमक्या येतात त्या अर्थी या व्यापारात फार मोठे लोक गुंतलेले आहेत. हे खरेही आहे कारण या रॅकेटने शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य केले होते आणि शाळांच्या शेजारी मुलांना मादक पदार्थांचा आस्वाद घेता यावा अशा सोयी निर्माण केल्या होत्या. कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांनी या प्रकारात तेलंगणातले सत्ताधारी नेते गुंतले असल्याचा आरोप केला आहे. आरोप करणारे नेते या बाबत प्रसिद्धच आहेत म्हणून त्यांचा हा आरोप नाकारता येणार नाही. या रॅकेटमध्ये राजकीय नेते गुुंतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता या प्रकाराची चौकशी करण्याचे सरकारने ठरवले आहे कारण प्रकार मोठाच गंभीर आहे.

Leave a Comment