एकुलते एक पणाची समस्या


महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या एका ज्येष्ठ आय. ए. एस. जोडप्याचा मुलगा संशयास्पद अवस्थेत मरण पावलेला दिसतो ही घटना मोठी धक्कादायक आहे. हा मुलगा सकाळीच आपल्या मित्राकडे म्हणून घरून जायला निघाला आणि काही वेेळातच एका इमारतीवरून पडून त्याचा मृत्यू झाला. ही आत्महत्या असावी असा तर्क केला जात आहे. पण घरून जाताना त्याने ज्या मित्राचे नाव सांगितले होेते. त्या नावाचा त्याचा कोणताही मित्र त्या इमारतीत रहात नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस त्या दिशेने तपास करायला लागले आहेत. दरम्यान या प्रकाराबाबत सर्वांच्याच मनात अनेक प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत.

त्यातल्या त्यात या दांपत्याचा हा एकुलता एक मुलगा होता. या निमित्ताने अधिक चर्चा होत आहे आणि ती साहजिक आहे कारण ही आपल्या समाजातली एक समस्या झाली आहे. मुलगा एकुलता एक आणि पालक श्रीमंत आणि बिझी. त्यामुळे मुलांना मातापित्याचा सहवास लाभत नाही. त्याचे अनेक मानसिक परिणाम मुलांवर होतात. त्यातच कुटुंब लहान आणि विभक्त असेेल तर त्याला आजी, आजोबा, लहान किंवा मोठे भावंड असे कोणीच मिळत नाही. अशा मुलांच्या पालकांचा दृष्टीकोन वेगळाच असतो. आपली स्थिती चांगली आहे तेव्हा आपल्याला एकुलते एकच मूल असले पाहिजे आणि त्याला आपण मागेल ते देऊ शकलो पाहिजे असे त्यांचे मत असते.

मुलाला महागड्या वस्तू नको असतात. त्यांना सहवास आणि प्रेम हवे असते. श्रीमंतांच्या अशा एकुलत्या एका मुलांपेक्षा गरिबांची दोन तीन मुले अधिक समाधानी असतात. कारण त्यांना वस्तू मिळत नाहीत पण कुटुंबातल्या माणसाचा सहवास आणि प्रेम मिळत असते. एकुलती एक मुले मात्र घरात न मिळालेल्या प्रेमाची भरपाई मित्रावर प्रेम करून करतात. पालकांना आपला मुलगा प्रेमाचा भुकेला असतो याची जाणीव नसतेे. कारण ते तो मागेल ते घेऊन देत असतात. त्याला पाहिजे ते मिळते मग तो समाधानी असलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. मग त्याचे मित्र कोण आहेत याची तर त्यांना काही माहिती असण्याचा प्रश्‍नच नाही. सकाळी सात वाजता आपला मुलगा त्याच्या मित्राकडे गेलाय. तो मित्र कोण आणि रहातो कोठे याचा काही पत्ता नाही. आपण स्पर्धेेच्या युगात ती जिंकण्यासाठी यशस्वी होत आहोत पण त्याची किती किंमत चुकवत आहोत याची काही कल्पना आपल्याला नाही.

Leave a Comment