माजी राष्ट्रपतींचे निवासस्थान


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे काही दिवसातच माजी राष्ट्रपती होणार आहेत. निवृत्त न्यायमूर्ती या नात्याने त्यांचे निवासस्थान, त्यांना मिळणारे वेतन यांचे स्वरूप काय आहे याविषयी लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. यापूर्वीच्या राष्ट्रपती या पूर्वीच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या निवृत्त झाल्यानंतर पुण्यात राहायला लागल्या आणि पुण्यातले त्यांचे निवासस्थान हा मोठाच वादाचा विषय झाला. कारण त्यासाठी त्यांना जी जागा देण्यात आली ती सैनिकांसाठीची जागा होती. त्यांच्या पूर्वीचे राष्ट्रपती एपीजे अब्दुलकलाम यांच्याबाबतीत कसलाही वाद निर्माण झाला नाही. कारण डॉ. कलाम यांचे राहणीमान फारच साधे होते. ते राष्ट्रपती असताना सरकारने नेमून दिलेला पगार घेत नसत आणि केवळ लाक्षणिकरित्या सरकारी खजिन्यातून दरमहा एक रुपया एवढे वेतन घेत असत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवेतनाचाही प्रश्‍न निर्माण झाला नाही.

त्या पार्श्‍वभूमीवर आता प्रणव मुखर्जी यांची माजी राष्ट्रपती म्हणून किती बडदास्त ठेवली जाते याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रणव मुखर्जी दिल्लीतच लुटेन्स मार्गावरील एका बंगल्यात राहणार आहेत. हाच बंगला डॉ. कलाम यांना देण्यात आलेला होता. त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे हा बंगला मोकळा आहे. तो आता प्रणव मुखर्जी यांना दिला जाणार आहे. या बंगल्याचे क्षेत्रफळ ११ हजार ७०० चौरस फूट एवढे असून त्यामध्ये एक प्रचंड ग्रंथालय बसेल एवढी जागा विशेषत्वाने निर्माण केली जात आहे. प्रणव मुखर्जी यांना वाचनाचे वेड असल्यामुळे त्यांच्यासाठी ही खास सोय करण्यात येत आहे.

राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बुलेट फ्रुप मर्सिडिज बेंज गाडी आता त्यांना सोडावी लागेल. राष्ट्रपतींना आता निवृत्तीनंतर ७५ हजार रुपये दरमहा एवढे निवृत्ती वेतन मिळेल. खरे म्हणजे हे निवृत्ती वेतन जुन्या नियमानुसार आहे. सध्या राष्ट्रपतींचा पगार दीड लाख रुपये आहे. त्यामुळे त्यांचे निवृत्ती वेतन ७५ हजार रुपये होत आहे. परंतु सध्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार राष्ट्रपतींचे वेतन दरमहा ५ लाख रुपये होणे अपेक्षित असून ते झाल्यानंतर निवृत्ती राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये एवढे निवृत्ती वेतन दिले जाईल. राष्ट्रपतींच्या सेवेत सध्या २०० सरकारी कर्मचारी असतात. परंतु निवृत्तीनंतर त्यांना सरकारच्या खर्चाने आयएएस असलेले दोन सनदी अधिकारी पुरवले जातील. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर सरकारी खर्चाने दोन टेलिफोन, देशात कुठेही मोफत प्रवासाचा पास आणि विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवली जाते.

Leave a Comment