डी. रुपा यांची लोकप्रियता


बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहातील उपमहानिरीक्षक डी. रुपा यांनी या कारागृहात चालणार्‍या गैरप्रकारांचा गौप्यस्फोट केल्यापासून हे कारागृह चर्चेचा विषय झाले आहे. डी. रुपा यांनी हा गौप्यस्फोट केल्यामुळे राज्यातले कॉंग्रेसचे सरकार आणि त्यांचे गृहखाते हे अडचणीत आले आहे. मात्र या कारागृहात काही गैरप्रकार होत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल असे सांगून प्रांजळपणे वस्तुस्थिती मान्य केली असती तर सरकारला अडचणीत येण्याची काही गरज नव्हती. परंतु सरकारने तसे न करता या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट करणार्‍या डी. रुपा यांची अन्यत्र बदली केली. तसेच शशिकला आणि तेलगी या दोघांना पंचतारांकीत सुविधा पुरवण्यात येत असल्याची मूळ तक्रार करणार्‍या कैद्यांना अन्य कारागृहात हलवले.

सरकारने प्रामाणिक अधिकार्‍यांचा असा बळी दिला असला तरी हे प्रकरण म्हणावे तेवढे शमलेले नाही. भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्या एका अधिकार्‍याचीही बदली करण्यात आली आणि तिथे नवीन अधिकारी नेमण्यात आला. परंतु डी. रुपा यांची इथल्या कैद्यांमध्ये जी लोकप्रियता आहे ती काही सरकारला कमी करता आलेली नाही. तिथल्या कैद्यांनी नव्या अधिकार्‍याचे स्वागत उपोषण करून केले. आपल्याला पुन्हा डी. रुपा याच उपमहानिरीक्षक म्हणून हव्या आहेत अशी उघड मागणी कैद्यांनी केली. या मागणीमुळे तर सरकारच्या अब्रूची लक्तरे चांगलीच चव्हाट्यावर टांगली गेली आहेत. एवढे होऊनही सरकार योग्य ती कारवाई करत नाही आणि सरकारचा पाय वरचेवर खोलात चालला आहे.

दरम्यान या कारागृहातील एक व्हिडिओ शुटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चित्रफितीमध्ये कैदी असलेल्या शशिकला आणि त्यांची बहीण इलावरसी या दोघी दिसत आहेत. या चित्रफितीत शशिकला यांच्या अंगावर कैद्याचा गणवेश नाही. त्याशिवाय त्यांच्या मागे मागे पोलीस अधिकारी फिरताना दिसत आहे. पोलीस अधिकार्‍याने कैद्याशी जसे वागले पाहिजे तसे न वागता हा अधिकारी शशिकला यांच्या भोवती गोंडा घोळल्यासारखा फिरत आहे. त्यावरून तो अधिकारी त्यांचा सहाय्यक आहे की काय असे वाटते. शशिकला यांच्या अंगावर भारी साडी आहे आणि त्यांच्या खोलीमध्ये एक नवा कोरा एलईडी स्क्रीन असलेला टी.व्ही. आहे. या कारागृहात ६० जणांमागे एक टी. व्ही. सेट देण्याचा नियम असताना केवळ शशिकलांना मात्र स्वतंत्र टी. व्ही. पुरवलेला आहे.

Leave a Comment