आगळीवेगळी किडनी चोरी


आपल्या देशात किडनीच्या विकाराने मरणोन्मुख झालेल्या व्यक्तीला किडनीची गरज असते. अन्य एखाद्या व्यक्तीची किडनी काढून त्याला बसवता येते. मात्र अशा किडनीदानाच्या बाबतीतील कायदे फार कडक आहेत. त्यामुळे किडनी दानाचे प्रकार चोरून केले जातात आणि त्यातूनच किडनी काढणे, ती बसवणे यासाठी रॅकेट कार्यरत राहतात. या रॅकेटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. अशा किडनी चोराच्या रॅकेटच्या बातम्या मोठ्या प्रमाणात छापल्याही जातात आणि त्यांच्यावर चर्चाही होते. मात्र कर्नाटकामध्ये किडनी चोरीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. या प्रकारात किडनी चोरांनी माणसांची नव्हे तर गायींची किडनी चोरलेली आहे.

माणसाच्या किडनीच्या चोरीमध्ये एखाद्या निरपराध, अशिक्षित व्यक्तीला त्याच्या नकळतपणे बेशुध्द करून त्याची किडनी काढून घेतली जाते. परंतु गायीच्या किडनीच्या चोरीच्या प्रकारात किडनी चोरांनी गायीची हत्या केलेली आहे आणि मेलेल्या गायीची किडनी काढून नेलेली आहे. याचा अर्थ गायीच्या किडनीचा वापर दुसर्‍या कोणा जिवंत गायीसाठी करण्यात आलेला नसून वेगळ्याच एखाद्या कामासाठी केलेला आहे. कर्नाटकच्या सावनूर गावामध्ये हा प्रकार घडला. या गावचे एक शेतकरी आपल्या गायीला गोठ्यात बांधून निवांतपणे झोपले होते. परंतु मध्यरात्री त्यांना गायीची धडपड आणि विचित्र आवाज ऐकायला आले. त्यामुळे संशय येऊन ते गोठ्यात गेले असता गायीचे पाय बांधून तिला मारून टाकलेले दिसून आले. तिची कत्तल केल्यानंतर पोट फाडलेले होते.

दुसर्‍या दिवशी त्यांनी अधिक तपास केला तेव्हा गायीची किडनी काढून नेलेली आढळली. तिचा काय वापर होत असेल याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र या संबंधात काही वेगळी माहिती समोर येऊ शकते. आपल्या देशात जनावरांची कत्तल करतात तेव्हा जनावरांच्या विविध अवयवांचा वेगवेगळा वापर होताना दिसतो. काही अवयवांमध्ये काही विशिष्ट रसायने असतात. कत्तल केल्यानंतर ती रसायने काढून वेगळी निर्यात केली जातात. अशा विशिष्ट रसायनांना मोठी मागणी असते. अशाच रितीने गायीच्या किडनीमध्ये एखादे विशिष्ट रसायन असण्याची शक्यता आहे. मात्र सध्या गायींच्या कत्तलींवर मोठी बंधने आल्यामुळे या रसायनाचा तुटवडा जाणवत असला पाहिजे. म्हणून अशा पध्दतीने चोरट्या पध्दतीने गायीला मारून तिची किडनी चोरून नेली असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment