अभिव्यक्ती स्वातंत्र्य : दुधारी शस्त्र


भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्‍न नेहमीच चर्चेला येतो. काही लोकांना आपल्याला जे वाटते ते सांगण्याचा बोलण्याचा अधिकार असावा असे वाटते. मात्र त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा असे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे की नाही अशी चर्चा सुरू होते. काही वेळा काही संघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहतात आणि ज्या कोणाची गळचेपी होत असेल त्यांचा आवाज बुलंद करतात. मात्र त्यांच्यावर तशी वेळ आल्यास त्यांना त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण होत नाही. कधी कधी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली जातात. तेव्हा हिंदू समाज त्यांच्या विरोधात उभा राहतो. मात्र काही सेक्युलर संघटना त्या भावना दुखावणार्‍या वक्तव्यांचे समर्थन करायला लागतात आणि त्यांना आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे म्हणायला लागतात.

महान चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विकृत दर्शन घडवित भारतमातेची नग्नचित्रे काढली. त्याशिवाय काही देवदेवतांच्याही प्रतिमा चितारल्या. त्यांच्या विरोधात एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांने खटला दाखल केला. त्यावर एम. एफ. हुसेन यांच्या समर्थकांनी हल्लाबोल केला. हुसेन हे चित्रकार आहेत आणि त्यांच्या मनाला येईल तशी चित्रे त्यांना काढता आली पाहिजेत असे समर्थन केले गेले. साधारणतः हिंदू धर्माच्या देवदेवतांचा असा प्रश्‍न आला की देशातले साम्यवादी, समाजवादी तसेच कॉंग्रेसचे समर्थक हिंदू धर्मीयांच्या भावनांची कदर न करता त्यांचा अपमान करणार्‍या कलाकारांच्या विरोधात उभे राहतात. त्यांना चित्रकारांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते.

ही सगळी मंडळी महात्मा गांधींविषयी आदर बाळगून असतात. मात्र एखाद्या कलाकाराने गांधींवर टीका करणारे नाटक लिहिले की मात्र या सगळ्या पुरोगामी मंडळींकडून अशा नाटकावर बंदी घालण्याची मागणी केली जाते. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे पण त्याचा वापर करून महात्मा गांधींवर टीका करता कामा नये असा त्यांचा दुटप्पी पवित्रा असतो. गेल्या आठवड्यात डॉ. अमर्त्य सेन यांच्या मुलाखतीवर आधारलेल्या एका लघूपटावर सेन्सॉर बोर्डाने काही बंधने घातली. कारण या लघूपटातून नरेंद्र मोदींविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो असे सेन्सॉर बोर्डाला वाटले. पण सेन्सॉर बोर्डाच्या या निर्बंधाविरुध्द कॉंग्रेसने आवाज उठवला आणि ही कलाकारांची मुस्कटदाबी आहे असा आरोप सेन्सॉर बोर्डावर आणि अप्रत्यक्षपणे सरकारवर केला.

मात्र या घटनेच्या पाठोपाठ मधूर भांडारकर यांचा इंदू राज हा चित्रपट आला. या चित्रपटात इंदिरा गांधींवर काही टीकाटिप्पणी करण्यात आली आहे असा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी भांडारकर यांची मुस्कटदाबी करायला सुरूवात केली आहे. साधारण आठवड्यापूर्वी अमर्त्य सेन यांच्यावरील चित्रपटाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा फडकवणार्‍या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मधूर भांडारकर यांना मात्र हे स्वातंत्र्य नाही अशी दुटप्पी भूमिका घ्यावी लागत आहे. म्हणजे त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रेम हे स्वतःवर प्रसंग आल्यास कसे बेगडी आहे हे दिसून येते.

Leave a Comment