आधुनिकतेची विकृती


कोलकत्ता येथे काही खाजगी क्लबांत मनमानी चालते. तिथे कोणाला प्रवेश द्यावा आणि कोणाला नाकारावा याचे काही नियम तिथल्या अर्धवट ज्ञानी संचालकांनी तयार केले आहेत आणि त्यानुसार ते लोकांना अपमानित करीत असतात. अशाच एका क्लबमध्ये नामवंत चित्रकार यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. कारण ते पायात रबरी चप्पल घालून आले होते. पायात कोणत्या प्रकारची पायताण वापरावी हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्‍न आहे पण क्लब चालवणारे दीड शहाणे माणसाची पारख त्याच्या पायात कसली वहाण आहे यावरून करीत असतील तर ती करणारांची लायकी तपासून पहावी लागेल.

काल कोलकत्त्याच्या एका मॉलमध्ये बंगाली चित्रपट निर्माती आशिष अवीकुंटक यांना ते धोतर नेसून आले असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना या गोष्टीचे आश्‍चर्य वाटले. त्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी महिलेने यावर प्रश्‍न विचारले असता त्यांना अडवणारा रक्षक आत गेला आणि त्याने आशिष यांना आत येण्याची अनुमती असल्याचे सांगितले. खरे तर त्यांनी काही प्रश्‍न विचारले म्हणून प्रवेश देण्यात आला नाही तर सदर धोतर नेसणारे गृहस्थ इंग्रजीत बोलत आहेत असे रखवालदाराने आतल्या साहेेबांना सांगितले म्हणून त्यांचा प्रवेश सुकर झाला. हा सारा प्रकार अर्धा मिनिटभर घडला. मॉलच्या व्यवस्थापनाने नंतर खुलासा करून आपला काही आशिष यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असे म्हटले पण तरीही काही प्रश्‍न शिल्लक राहतातच.

आपण अनेकदा मॉलमध्ये जात असतो. पण आत जाण्यासाठी परवानगी लागते असा काही अनुभव कधी येत नाही. याही मॉलमध्ये प्रवेश नाकारलेला नाही पण धोतर नेसून आलेल्या माणसाला आत प्रवेश द्यावा की नाही असा काहीसा प्रश्‍न त्या रखवालदाराच्या मनात आला हे तर खरेच आहे. म्हणजे धोतर नेसणारा माणूस प्रवेश करताना अडवावा लागतो ही त्याची भावना वाईट आहे. खरे तर धोतर हे भारतीयांचे परंपरागत वस्त्र आहे. करोडो लोक धोतर नेसतात. पण भारतातच धोतर नेसणारांना कमी लेखले जाते ही गोष्ट आपल्या स्वत्वाच्या संबंधात असलेल्या न्यूनगंडाची आहे. आशिष यांना अडवणारा सुरक्षा जवान धोतर नेसणारा नसेल पण त्याच्या घरात कोणी तरी धोतर नेसत असेलच. पण त्याला धोतर हे अपात्रतेची निशाणी वाटली आणि इंग्रजी बोलणे हे मात्र पात्रतेचे लक्षण वाटले. आधुनिकता म्हणजे काय याविषयीचा किती गैरसमज लोकांत निर्माण झाला आहे याचे हे द्योतक आहे.

Leave a Comment