प्रेशर कूकर जनरेशन


सध्या आपल्या समाजात नव्या पिढीला दोष देण्यात समाधान मानले जात आहे. नाही तरी जुन्या पिढीने नव्या पिढीला काही ना काही कारणाने बेजबाबदार ठरवण्याचा प्रघातच आहे. पण आता तर नवी पिढी एवढी बदलली आहे की जुन्या पिढीला हे बदल पाहून भोवळ यावी. असे असले तरी बदल स्वीकारला म्हणून कोणी कोणाला नावे ठेवता कामा नयेत. उलट आताची नवी पिढी किती अडचणीतून वाट काढत आहे याचा आपण सहानुभूतीने विचार करायला हवा आहे. सध्याची पिढी प्रचंड तणावातून वाट काढत आहे. नामवंत लेखक देव लाहिरी यांनी विथ अ लीटल हेल्प फ्रॉम माय फ्रेडस् या पुस्तकात नव्या पिढीचा विचार वेगळ्या प्रकाराने केला आहे.

देव लाहिरी या पिढीला प्रेशर कुकर जनरेशन असे म्हणतात. कारण ही मुले प्रचंड प्रेशर खाली म्हणजे दबावा खाली जगत असतात. त्यांना जुन्या पिढीने आदर्श बालक होण्याची सक्ती केली आहे आणि आपली ती अपेक्षा पूर्ण करताना या मुलांना सध्याचा जमाना स्पर्धेचा असल्याचा धाकही घातला आहे. त्यांनी परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजेत असा दबाव तर आहेच पण त्यासाठी त्याला शिकवणी वर्गाच्या चरकातून पिळून काढायला सुरूवात केली आहे. जुन्या पिढीला शाळा सुटली की मोकळीक मिळत असे पण आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिकवणी आवश्यक झाली आहे आणि पाचवी सहावीच काय पण तिसरी चौथी पासून ही पिढी शिकवणी लावायला लागली आहे. या पिढीला आपल्या दिवसात शिकवणीसाठी वेळ राखून ठेवावा लागतो ही या पिढीची खासियत आहे.

एवढे करून हा अत्याचार थांबत नाही. मुलांंना किती तरी अन्य क्लासेसमधून पिळून काढले जाते. व्यक्तिमत्त्व विकास, उन्हाळी संस्कार वर्ग, गायन, वादन, क्रिकेट अशा किती तरी छंदांची त्यांच्यावर सक्ती करण्यात येत असते. या सगळ्यातून ही नवी पिढी अगदी भरडून निघाली आहे. तिच्यावर एवढीच सक्ती आहे असे नाही. चांगले दिसण्याचीही सक्ती आहे. त्यातल्या त्यात मुलींवर तर जास्तच सक्ती असते. अशा अनेक प्रकारच्या दबावातून या मुलांची व्यक्तिमत्त्वे फुलण्याऐवजी कोमजून जातात. लाहिरी यांनी या पिढीची ही अवस्था आपल्या या पुस्तकात फार साक्षेपाने वर्णन करून सांगितली आहे. आपण स्पधेंचा विचार करून त्यांना पिळून काढत असतानाच ही मुले शरीरात होत असलेल्या बदलांनी तर किती अस्वस्थ असतात याची कोणाला चिंताही नसते आणि त्याबाबत कोणी मार्गदर्शनही करीत नाही.

Leave a Comment