विवाहाची समस्या


चार वर्षांपूर्वी पुण्याच्या एका दैनिकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींची पाहणी करून त्यांना कसा जोडीदार हवा आहे हे जाणून घेतले होते. तेव्हा अनेक मुलींनी अनेक प्रकारची मते व्यक्त केली होती. पण त्या मुलींमध्ये एका बाबतीत मात्र एकमत होते. त्यांना शेतकरी नवरा नको आहे याबाबत त्यांचे एकमत होते. एकेकाळी आपल्या समाजात, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे समजले जात होते पण आता ती उलटी करण्यात आली असल्याचे दिसून आले. मुली आणि त्यांचे पालक आता नोकरी उत्तम समजायला लागले आहेत. कारण शेती हा व्यवसाय वरचेवर बेभरवशाचा होत चालला आहे. शेतकरी नवरा केल्यास शेतात राबावे लागेल आणि एवढे राबूनही हाता तोंडाची गाठ पडणे मुष्कील.

ज्यांच्या घरात शेेती व्यवसाय नसतो त्यांना तर शेतकर्‍यांची अशी अवस्था ऐकून माहीत असते पण ज्यांना शेतकरी जीवन अनुभवावे लागते अशा शेतकर्‍यांच्या मुलींना ही अवस्था काही सांगावी लागत नाही. त्या अशा स्थितीतूनच लहानाच्या मोठ्या झालेल्या असतात. तेव्हा शेतकर्‍यांच्या मुलीही शेतकरी नवरा नकोे म्हणणार्‍यांत पुढे आहेत. शहरातले चाकरमाने जीवन त्यामानाने सुखी असते. शेतीतल्या अनिश्‍चितत जीवनातून केवळ मुलीच विवाहाच्या निमित्ताने बाहेर पडू इच्छित आहेत असे नाही तर शेतकरी आपल्या मुलांनाही शेतीतून बाहेर पडण्यास उद्युक्त करीत आहेत. ज्यांना ते जमले ते शहरात स्थिर झाले आहेत.

ज्यांना यातून बाहेर पडणे अशक्य झाले त्यांना आता सातत्याने अनिश्‍चिततेशी सामना करीत जगावे लागत आहे. ते स्वत:च असे जीवन जगत आहेत मग त्यांची भागीदार होऊन जगण्यास कोणती मुलगी कशाला हे आयुष्य स्वीकारेल? परिणामी शेती करणार्‍या मुलांच्या विवाहाचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. एका स्वयंसेवी संघटनेने या समस्येचा पाठपुरावा करीत प्रत्यक्ष पाहणीच केली तेव्हा त्यांना एकेका गावात असे कुंवारे मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. खरे तर १९९१ सालपासून या समस्येची चाहूल लागली होती. कारण तेव्हाच समाजात मुलींची संख्या कमी होत असल्याचे दिसायला लागले होते. स्त्रीभ्रुणहत्यांच्या वाढत्या प्रकरणांनी ही स्थिती निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण तेव्हा आपण सावध झालो नाही. ही हरियाणातली किंवा अन्य कोणत्या तरी राज्यांतली समस्या आहे तेव्हा आपण घाबरायचे काही कारण नाही असे आपण समजून बसलो होतो पण ती समस्या आता आपल्यापर्यंत येऊन पोचली आहे.

Leave a Comment