प्रामाणिक चूक


मुंबईत संदिप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने काल एका बिल्डरने त्याला लाच म्हणून दिली असलेली कथित रक्कम पत्रकार परिषदेत सादर केली. त्याने या लाचेची ४० लाखाची रक्कमच सर्वांसमोर ठेवली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एक बिल्डर गैरव्यवहार करीत होता पण तो प्रकट करू नये म्हणून त्याने आपल्याला एक कोटी रुपये दिले, त्यातले ६० लाख रुपये आपण गरिबांचे खटले लढवण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित ४० लाख रुपये हे आहेत असे म्हणून त्याने ही रक्कम तर समोर ठेवलीच पण ते ४० लाख रुपये आपण मुख्यमंत्री निधीला देणार आहोत असेही त्याने जाहीर केले. हा सगळा प्रकार पाहिला म्हणजे येवले याने किती मोठी चूक केली आहे याचा अनुभव येतो.

त्याचा हा पैसा जाहीरपणे प्रदर्शित करण्यामागचा हेतू नेमका काय याचा काही पत्ता लागत नाही. आपल्याला लाच देणार्‍या बिल्डरला अटक होऊन त्याच्यावर खटला भरला जावा अशी त्याची इच्छा असेल तर ती कदापिही पूर्ण होणार नाही कारण अशा प्रकारचा भ्रष्टाचार उघडा करण्याची ही काही पद्धत नाही. हे पैसे त्या बिल्डरने दिले आहेत असा आरोप त्याने केला आहे पण त्यावर विश्‍वास ठेवायचाच कसा? ते पैसे त्या बिल्डरचेच आहेत याचा कसलाही पुरावा येवले यांनी सादर केलेला नाही. लाच म्हणून एक कोटी रुपये दिले पण त्यातले ६० लाख रुपये खर्चले असे त्याचे म्हणणे आहे पण यालाही काही पुरावा नाही. विशेष म्हणजे बिल्डरने हे पैसे दिल्याचे मान्य केले आहे. मात्र लाच म्हणून नव्हे. तर झोपडपट्टीवासियांचे आगाऊ भाडे म्हणून दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या म्हणण्यालाही काही पुरावा नाही.

आता येवले यांनी हे ४० लाख रुपये मुख्यमंत्री निधीला देण्याचे जाहीर केेले आहे पण त्याला तसेेही करता येणार नाही. कारण असे लाच म्हणून दिलेल्या पैशाचे काय करायचे हे पोलीस ठरवत असतात. मात्र येवले हे जितके तळमळीचे कार्यकर्ते आहेत तितकेच ते कायद्याविषयी अनभिज्ञ आहेत. गंमतीचा भाग असा की नेमका कोणता गैरव्यवहार लपवण्यासाठी त्यांना ही लाच दिली गेली आहे तो गैरव्यवहार काय आहे हे काही ते सांगत नाहीत. अशा प्रकारची स्टंटबाजी करून काही भ्रष्टाचार नष्ट होत नसतो. हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे. भ्रष्टाचार उघड करण्याचीही काही पद्धत असते आणि पुरावे समोर ठेवूनच तो उघड करायचा असतो. तसे न केल्यास आरोपी निर्दोष सुटण्याचा धोका असतो.

Leave a Comment