बहिष्काराचे अस्त्र


चिनी मालाची भारतातली आवक वाढत असल्याचे जाणवते. त्यामुळे एक दिवस सारी अर्थव्यवस्था चीन गिळंकृत करून टाकेल अशी भीती अनेकांना सतावत असते. वास्तविक तसे होणार नाही. पण तरीही या संबंधातल्या अज्ञानातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन वारंवार केले जात असते. असा बहिष्कार टाकल्यास चीन शरण येईल असा या बहिष्कावादी लोकांचा दावा असतो. पण तो कितपत खरा आहे हे तपासून पाहिले असता बहिष्काराचे अस्त्र हे बोथट असल्याचे लक्षात येते. चिनी मालावर बहिष्कार घालणे हीच केवळ देशभक्ती आहे आणि चिनी माल वापरणे हा देशद्रोह आहे अशी भावना मात्र वेगाने वाढवली जायला लागली आहे.

एका बाजूला चीनच्या बाजूला हे आवाहन केले जात असतानाच भारत सरकारने नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या उभारणीचे कंत्राट चीनला दिले आहे. चीनशी कसल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करणे हा देशद्रोह असेल तर भारत सरकार चीनला हे कंत्राट देऊन देशद्रोह करत आहे असे म्हणावे का? चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे कथित देशभक्त या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत. कारण चिनी माल, त्यांच्या किंमती, त्यांची आवक, विक्री इत्यादी गोष्टींचे त्यांचे ज्ञान फारच मर्यादित आणि नित्य वापरातल्या चिनी वस्तूंपुरतेच मर्यादित आहे. प्रत्यक्षात चीनकडून आपण काय काय विकत घेत असतो याची त्यांना नीट कल्पनाच नाही.

या देशभक्त मंडळींचा सारा भर विजेच्या दिव्यांच्या माळा, रंगाच्या पिचकार्‍या, विद्युत उपकरणे आणि काही वाहनांचे सुटे भाग अशा किरकोरळ व्यापारावरच आहे. प्रत्यक्षात चीनचा भारताशी जो व्यापार होतो तो याच्यापेक्षाही कितीतरी मोठा आणि त्या पलीकडे जाणारा आहे. तो कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष आहे. त्यामुळे चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन व्यवहारात उतरणे हे मोठे कर्मकठीण आहे. या आवाहनातून एक धोका संभवतो. आपण सर्वांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला तर त्यांना पर्याय म्हणून आपल्याला जपान, कोरिया, तैवान या देशातला किंवा देशी माल विकत घ्यावा लागेल. जो चीनपेक्षा महाग असेल. म्हणजे आपण चिनी मालावर बहिष्कार टाकून पर्यायी महाग माल विकत घेऊन आपले आर्थिक नुकसानच करून घेणार आहोत तेव्हा अशा प्रकारचे आवाहन करताना थोडेसे गंभीरपणे आणि सखोलपणे काही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे.

Leave a Comment