दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला


अमरनाथ यात्रेस गेलेल्या आणि दर्शन घेऊन परतणार्‍या गुजरातेतल्या एका वाहनावर पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ७ भाविक प्राणास मुकले तर ३२ जण जखमी झाले. काश्मीर खोर्‍यातल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. कारण दहशतवाद्यांचे हे कृत्य भ्याडपणाचे आहे. या हल्ल्याबाबत विचार करताना गेली १७ वर्षे अमरनाथ यात्रा सुखरूपपणे पार पडत आलेली आहे. याचा विसर पडता कामा नये. या १७ वर्षांच्या काळात केवळ दोन वेळा असा हल्ला झाला. याही वर्षी गेले १३ दिवस ही यात्रा सुखरूपपणे पार पडलेली आहे. त्यासाठी सरकारने प्रचंड बंदोबस्त लावलेला आहे. सुमारे ४० हजार जवान यात्रेकरूंच्या बसचा ताफा सुखरूपपणे अमरनाथपर्यंत नेतात आणि परत आणतात.

यावर्षीच्या १३ दिवसांमध्ये सुमारे १ लाख ३५ हजार यात्रेकरूंची ही यात्रा बिनधोकपणे पारही पडलेली होती. मात्र कालच काहीतरी चूक घडली आणि दहशतवाद्यांना हा हल्ला करण्याची संधी मिळाली. वास्तविक पाहता ते या बसचेच लक्ष्य करून आलेले नव्हते. त्यांनी एका पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना चोख उत्तर दिले. त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जावे लागले. जाता जाता त्यांनी बेधुंदपणे या बसवर हल्ला केला आणि अगतिकपणे केलेला त्यांचा हा हल्ला ७ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. आता याची चौकशी होईल आणि नेमकी कोठे गफलत झाली याचा शोध घेतला जाईल. परंतु सरकारने या हल्ल्यानंतरही यात्रा सुरूच राहील असा निर्धार जाहीर केला आहे तो कौतुकास्पद आहे.

हल्ला झालेल्या बसच्या चालकाने मोठ्या हुशारीने हल्ला होत असतानाही विचलित न होता गाडी वेगाने पण सुरक्षितपणे चालवत नेली आणि सुरक्षित ठिकाणी आल्यानंतरच ती थांबवली. त्याने हे धैर्य दाखवले नसते आणि प्रसंगावधान राखले नसते तर मृतांचा आकडा वाढू शकला असता. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ते योग्यच आहे. परंतु या हल्ल्यानंतर आपल्या देशामध्ये नेहमीचेच प्रकार सुरू झाले आहेत. हल्ला दुःखद आहे आणि तो व्हायला नको होता हे तर कोणीही मान्यच करेल. परंतु काही अतिरेकी प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍यांनी आता काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यापर्यंत मजल गाठली आहे. काही लोकांनी तर आता पाकिस्तानवर हल्लाच करावा असाही सरकारला सल्ला दिला आहे. मात्र अशा टोकाच्या निर्णयाची काही गरज नाही.

Leave a Comment