सेल्फीचे वेड भोवले


नागपूरजवळ वेन्ना प्रकारच्या जलाशयात एक बोट उलटून ८ तरुण बुडून मरण पावल्याची दुःखद बातमी आहे. या ८ जणांच्या कुटुंबावर जे संकट कोसळले आहे ते कोणाचे हृदय हेलावून टाकणारे आहे हे नाकारता येत नाही परंतु या संबंधात अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. आपण नेहमीच अशा अपघातांच्या बातम्या वाचतो आणि हळहळतो. परंतु या घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांच्या वर्तनाकडे आपले लक्ष नसते आणि एखाद्या माणसाचा जीव गेल्यानंततर त्याची काही चूक झाली होती का याची चर्चा होत नाही. कारण तशी ती केली तर थोडेसे निर्दयीपणाचे ठरते आणि अनुचितही वाटते. परंतु अशी चर्चा होण्याची गरज आहे. कारण तशी ती झाली तरच पुढे असे अपघात होणार नाहीत आणि पाण्याशी किंवा विजेशी खेळताना कशी दक्षता घेतली पाहिजे याचे भान लोकांना येईल.

नागपूरजवळचा हा बोटीचा अपघात ज्या जलाशयात झाला त्या जलाशयात जलतरण आणि मासेमारी यांना बंदी होती. असे असतानाही हे सारे तरुण नेमके त्याच जलाशयामध्ये बोटिंग करत गेले कसे असा प्रश्‍न सुरूवातीला उपस्थित होतो. त्यावर चर्चाही सुरू आहे. त्यातून असे लक्षात येते की जर या पाण्यात बोटिंगला मनाई होती तर या मनाईचा भंग करून कोणी पाण्यात उतरू नये यावर नजर ठेवणारी यंत्रणा निर्माण करायला हवी होती. परंतु तशी काही यंत्रणा येथे नव्हती असे एकंदर प्रकारावरून लक्षात येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा एखादा रक्षक तेथे नसला तरी ज्यांना अपघात झाला त्यांनी स्वतःहून बंधन पाळायला हवे होते.

अशावेळी सुरक्षिततेचे पुरेसे भान राखले गेलेले नव्हते. या बोटीतल्या सर्वांना पोहायला येत नव्हते. त्यामुळे त्यांनी लाईफ जॅकेट परिधान करूनच बोटिंग करायला हवी होती. कारण या बोटीतल्या ११ जणांपैकी केवळ तिघांनाच पोहायला येत होते आणि उर्वरित आठजण पोहायला येत नव्हते तसेच त्यांच्याकडे लाईफ जॅकेट नव्हते म्हणून प्राणास मुकले. सर्वात दुःखदायक बाब म्हणजे या सार्‍या तरुणांना बोट जलाशयाच्या मध्यभागी आली असताना सेल्फी काढण्याचा मोह झाला. आज काल सेल्फीचा अतिरेक झाला आहे. पर्यटनाच्या ठिकाणी, डोंगरावर, धबधब्याच्या शेजारी मागचा पुढचा विचार न करता सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना गेल्या एक-दोन वर्षात अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. त्याच्या बातम्यांचीही चर्चा होत असते परंतु हे सारे माहीत असतानाही जलाशयामध्ये सेल्फी काढण्याचा या लोकांना मोह व्हावा हे अविचारीपणाचेच लक्षण आहे.

Leave a Comment