सप्लिमेंटरी डाएट काय आहे?


सध्या लोकांची जीवनशैली अनेक रोगांना निमंत्रण देणारी ठरली आहे आणि त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम, टॉनिक, योगा, जीम यांचे प्रस्थ वाढत आहे. त्यातच आता सप्लिमेंटरी डाएट याचाही शिरकाव झाला आहे. प्रकृती चांगली रहावी यासाठी सप्लिमेंटरी डाएट घेतले पाहिजे असा समज सरसकट दृढ होत आहे. त्यामुळे व्हिटॅमीनच्या गोळ्या, ओमेगा ३, कॅल्शियम टॅबलेटस् आणि मल्टिव्हिटॅमीन टॅबलेटस् हा अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग व्हायला लागल्या आहेत. प्रत्येकाचे खाणे तर पोषण द्रव्यांनीयुक्त असायला हवेच पण त्यााच बरोबर अशाप्रकारचे सप्लिमेंटरी डाएटसुध्दा आवश्यक आहे असे समजून बरेच लोक सरसकट, डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्या मनानेच असे सप्लिमेंटरी डाएट घेत सुटले आहेत.

खरे म्हणजे असे सारे प्रकार अज्ञानातून घडत आहेत. कारण प्रत्येकालाच सगळ्याच प्रकारच्या सप्लिमेंटरी डाएटची काही गरज नसते. मुळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सप्लिमेंटरी डाएट हे औषध नाही. ते कोणताही आजार दुरूस्त करत नाही. आपण पोषक द्रव्ये अन्नातून सेवन करत असतोच. परंतु आपल्या काही सवयी, आहाराचे प्रकार, वय, जीवनपध्दती यांच्यामध्ये काही दोष असतात आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट पोषक द्रव्याची कमतरता निर्माण होते. एखाद्या व्यक्तीचा आहार चांगला असतो पण त्यात नेमका ड जीवनसत्त्वाचा अभाव असतो. मग त्याला त्या अभावामुळे काही पीडा सतवायला लागतात. अशावेळी त्याला केवळ ड जीवनसत्त्वाचा पुरवठा होईल असा सप्लिमेंटरी आहार द्यावा लागतो.

तो अभाव कमी झाला की त्यामुळे होणारी कमतरता भरून निघते. पण त्याने तो आहार घेण्यापूर्वी डॉक्टरकडून स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे आणि आपल्याला नेमक्या कोणत्या पोषणद्रव्याचा अभाव आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यानंतरच कोणता पूरक आहार घ्यावा याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतला पाहिजे. तरच तो पूरक आहार त्याच्या उपयोगी पडेल. पण आपण सरसकट बाजारात उपलब्ध होणारे सप्लिमेंटरी डाएट आपल्या मनानेच घेत बसलो तर त्याचा एकतर काही फायदा होणार नाही आणि दुसरे म्हणजे आपल्या सामान्य आहारातून आपल्याला आधीच जे पोषण द्रव्ये उपलब्ध होत असते तेच आपण सप्लिमेंटरी डाएट म्हणून आणखी घेत राहू आणि ते पोषण द्रव्ये शरीरात जास्त झाले म्हणजे त्याचा फायदा होण्याऐवजी तापच होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment