तरच मंजुळाला न्याय मिळेल


मुंबईच्या भायखळा कारागृहातील मंजुळा शेटिया हिच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांना या कामातून मुक्त करण्यात आलेले आहे. या मृत्यूच्या संबंधात तुरुंगातील ६ कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना अटकही करण्यात आलेली आहे. स्वाती साठे यांच्यावर हे काम सोपवण्यात आले होते परंतु त्यांच्या काही ट्विटवरून त्या चौकशी करण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीच कार्यरत असल्याचे दिसून आले. कारण या प्रकरणात आरोपीही पोलीसच आहेत आणि तपास पोलीसच करत आहेत. त्यामुळे स्वाती साठे यांनी आपण आपल्या कर्मचारी भगिनींना आधार दिला पाहिजे असा संदेश सर्वांना पाठवला.

या प्रकरणात सकृतदर्शनीच अनेक संशय दाटून येतात. पोलिसांनी केलेल्या एखाद्या गुन्ह्याचा तपास पोलिसांवरच सोपवला तर त्या तपासातून काही निष्पन्न होणार नाही. कारण आरोपीही पोलीसच आहेत आणि तपासाधिकारीही पोलीसच आहेत. तेव्हा पोलीस पोलिसांना वाचवण्याकरिता काहीतरी गडबड करणार हे निश्‍चित आहे. याबाबतीत पोलीस हे वाकब्गार असतात हे आपल्याला माहीतच आहे. स्वाती साठे या त्या दिशेने कामाला तर लागल्या होत्याच परंतु आरोपी पोलीस महिलांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून वर्गणी जमा करण्याचीही टूम निघाली आहे. हा सारा प्रकार उद्वेगजनक आहे.

हे सारे प्रकार सुरू असतानाच ही खुनाची केस वीक व्हावी यासाठी शवविच्छेदनाच्या अहवालातसुध्दा फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हे सारे प्रकार उघड करत आहेत. खरे म्हणजे या प्रकरणात तपास करण्याची जबाबदारी पोलिसांकडे न सोपवता पोलिसांच्या बाहेरच्या सीबीआयसारख्या यंत्रणांकडे सोपवायला हवी होती. ते शक्य नसते तर निदान महाराष्ट्र पोलिसांच्याच गुन्हे अन्वेषण खाते किंवा गुन्हे शाखा अशा वेगळ्या खात्याकडे तरी तो सोपवायला हवी होती. पण त्याऐवजी ती जबाबदारी गुन्हा करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्याच खात्याकडे सोपवली गेली. तिथेच आरोपी निर्दोष सुटण्यासाठी प्रयत्न व्हायला सुरूवात झाली. आता तर स्वाती साठे यांना या कामातून मुक्त करणे पुरेसे नाही अशी मागणी होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारा अर्ज दाखल झालेला आहे.