झोन डाएटचा नवा फंडा


आहार आणि त्यांचे व्यवस्थापन हा कायमचा चर्चेचा विषय असतो. कारण आजकाल सर्वांनाच फिटनेसचे वेड लागलेले आहे. शिवाय वाढती जाडी ही अनेक नव्या समस्या घेऊन येत आहे. या संबंधात विविध वृत्तपत्रांमधून आणि सोशल मीडियावरून सातत्याने माहिती दिली जात असते. परंतु काही आहारतज्ञांनी या माहितीच्या संदर्भात एक स्पष्ट सूचना दिलेली आहे की, एकाच प्रकारचा आहार किंवा एकाच प्रकारची पथ्ये ही सर्वांना लागू पडणार नाहीत. व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती याही ठिकाणी लागू पडते. आपण एखाद्या जाहिरातीमध्ये कोणीतरी महिन्यात २० किलो वजन कमी केल्याचे वाचतो अणि त्याचे अनुकरण करून आपलेही वजन घटते का हे पहायला लागतो. मात्र आहाराची एकाच प्रकारची पथ्ये प्रत्येकाला लागू पडत नाहीत. प्रत्येकाची पथ्ये वेगळी असतात.

यासाठी आहारतज्ञांनी आता झोन डाएट ही नवी संकल्पा रूढ करायला सुरूवात केली आहे. झोन डाएटमध्ये व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आहाराची शिफारस केली जाते आणि या आहारामध्ये त्याचे केवळ वजनच कमी होते असे नाही तर त्याचे सर्वसाधारण आरोग्यही सुधारते. म्हणजे या आहारामध्ये आरोग्य सुधारण्याला महत्त्व दिले आहे. एखाद्या माणसाचे वजन किती असावे याचा एक चार्ट तयार केलेला असतो आणि त्याचा बिएमआय इंडेक्स काढला जातो. या तज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीचा बिएमआय १-२ अशांनी कमी असला तरी चालतो परंतु ती व्यक्ती तंदुरूस्त असली पाहिजे आणि उत्साही असली पाहिजे. जैव रसायन विषयाचे प्राध्यापक बेरी सिअर्स यांनी ही संकल्पना रूढ केलेली आहे.

सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला जेवणामध्ये ३० टक्के स्निग्ध पदार्थ, ३० टक्के प्रथिने आणि ४० टक्के कर्बोदके हवी असतात. तेव्हा काय खाता, कधी खाता आणि किती खाता यापेक्षासुध्दा स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि कर्बोदके यांचे गुणोत्तर आपण आपल्या जेवणात पाळतो की नाही याला जास्त महत्त्व असते. कोणतेही आहारतज्ञ किंवा डॉक्टर फळे आणि भाज्या खाण्यावर भर द्यायला सांगतात. परंतु झोन डाएटच्या प्रवर्तकांना ही गोष्ट मान्य नाही. त्यांच्या मते काही भाज्या आणि फळे वर्ज्य आहेत. त्यांच्या मतानुसार केळी, आंबे, बटाटे, चिकू, गाजर ही फळे आणि फळभाज्या माणसाचे वजन वाढवायला मदत करत असतात. असे प्रमाण सांभाळत असतानाच स्निग्ध पदार्थांचा अतिरेक होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचा झोन डाएटचा आग्रह आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment