माणुसकीचे धिंडवडे


आजकाल लोक एवढे स्वार्थी आणि आत्मनेन्द्रित झाले आहेत की, त्यांना माणुसकीही राहिलेली नाही. काल शिव ते पनवेल या महामार्गावर लोकांच्या या हीन मनोवृत्तीचे दर्शन घडवणारा प्रकार घडला. या मार्गावर एक टेम्पो उलटला आणि टेम्पोचा ड्रायव्हर, क्लिनर आणि आणखी एक प्रवासी बाहेर फेकले जाऊन जखमी झाले. या टेम्पोतून मासे नेले जात होते. ते रस्त्यावर इतस्तत: विखुरले गेले. अपघात पाहून काही लोक धावून आले. ते आता या जखमींना रुग्णालयात पोचवतील असे वाटले होते पण जखमांनी विव्हळत पडलेल्या या जखमींकडे कोणीही पाहिले नाही. त्याऐवजी लोकांनी विखरून पडलेले मासे आपल्या जवळच्या पिशव्यात भरून पळवायला सुरूवात केली.

काही लोनांनी जखमींना पाहिले. ते जखमांमुळे आक्रोश करीत होते पण त्या आक्रोशाने एकालाही दया आली नाही. या जखमींच्या जवळ पडलेले मासे त्यांनी या जखमींना हटवून जमा केले पण जखमींना रुग्णालयात नेण्याचा विचार कोणाच्याही मनाला शिवला नाही. या अपघाताने वाहतुकीची कोंडी झाली. अनेक वाहने अडली आणि त्यातल्या काही वाहनातले लोक खाली उतरून अपघात पहायला आले पण त्याही लोकांनी जखमींना मदत करण्याऐवजी मासे भरायलाच सुरूवात केली. या आपमतलबी वृत्तीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आता लोकांना नेमके काय झाले आहे याचा काही थांग लागत नाही. माणसाप्रती ते एवढे बोथट का झाले आहेत हे कळत नाही.

साधारणत: असा अनुभव येतो की असा अपघात एखाद्या खेड्याजवळ घडला तर खेड्यातले लोक पळत येतात आणि अपघातात सापडलेल्यांना मदत करतात पण शहरातले लोक एवढे शिकलेले असूनही (किंबहुना जास्त शिकल्यामुळेच) माणुसकीला पारखे होतात. गेल्या आठवड्यात पाकिस्तानात अशीच घटना घडली. पेट्रोल भरून निघालेला टँकर महामार्गावर उलटला. त्या अपघाताच्या परिसरातले लोक धावले आणि त्यांना टँकर चालकाला मदत करण्याऐवजी जमेेल तेवढे पेट्रोल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यांच्या हावरटपणाचे फळही मिळाले. कोणी तरी काडेपेटीतली काडी ओढली आणि मोठी आग लागून जवळपास १५० लोक भाजून मरण पावले. जी वस्तू आपली नाही तिला आपण हात लावता कामा नये हा संस्कार लहानपणापासून मुलांवर करायला हवा. ते सभ्यपणाचे लक्षण असते. पण आता आता आपण संस्कार या गोष्टीची कुचेष्टा करायला लागलो आहोत.

Leave a Comment