बेनामी संपत्तीवर कुर्‍हाड


गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकोटरा मैदानावर देशभरातल्या चार्टर्ड अकौंटंटस्समोर भाषण करताना देशातल्या एक लाख बोगस कंपन्या निकालात काढण्यात आल्या असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय अशाच प्रकारे संशयास्पद व्यवहार करणार्‍या ३ लाख कंपन्या आयकर खात्याच्या रडारवर असल्याचेही मोदींनी घोषित केले. देशातले अनेक अर्थतज्ञ मोदींची नोटबंदी फसली आहे असा प्रचार करण्यात धन्यता मानतात. परंतु नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा नोटाबंदी फसलेली नसून तिचे चांगले परिणाम आपल्याला जाणवत आहेत असे स्पष्ट केले आहे. तीन लाख बोगस कंपन्या रडारवर असणे आणि एक लाख कंपन्या रद्द होणे हा काही सामान्य परिणाम नव्हे. त्याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांच्या बेनामी कंपन्या आणि मालमत्तांवर टाच आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या मागेसुध्दा अशाच प्रकारची कारवाई लागलेली आहे. लालूप्रसाद असोत की छगन भुजबळ यांनी बेनामी व्यवहार करत असताना ते लपूनच राहणार असे गृहित धरलेले होते.

आजवरच्या आपल्या देशातल्या सगळ्या सरकारांनी अशा बेनामी व्यवहारांकडे दुर्लक्षच केले होते. कारण ते व्यवहार जर त्यांनी उघड केले असते तर त्यामध्ये त्यांच्याशी संबंधित असलेले लोकच अडकण्याची जास्त शक्यता होती. त्यामुळे हितसंबंधांचा विचार करून आजवरच्या सरकारांनी अशा बेनामी आणि बनावट कंपन्यांकडे दुर्लक्षच केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र याबाबत आपले धोरण स्पष्ट केले आहे. आपल्याला त्रास झाला तरी हरकत नाही आणि कोणी दुखावले तरी आपल्याला चिंता नाही. आपण बेनामी आणि खोट्या व्यवहारांवर कारवाई करणाच असे त्यांनी परखडपणे सांगितलेले आहे. त्याचेच प्रत्यंतर लालूप्रसाद आणि छगन भुजबळ अशा भ्रष्ट नेत्यांवरील कारवाई वरून येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांची तर बेनामी मालमत्ता आयकर खात्याने शोधून काढली असून प्रत्यक्षात भुजबळ यांची असलेली परंतु अन्य लोकांच्या नावावर असलेली मालमत्ता कोठे कोठे आहे याचा पूर्ण शोध घेतलेला आहे. आजवर अशा प्रकारच्या मालमत्ता कमावताना भुजबळ किंवा तत्सम नेत्यांनी काय विचार केला होता हे कळत नाही. परंतु कितीही काळे व्यवहार केले तरी ते खपूनच जातात. कारण बहुतेकांनी असेच व्यवहार केलेले असतात. तेव्हा आपणही बिनदिक्कतपणे करावेत असा विचार त्यांनी केलेला असतो. अशी कितीही बेनामी संपत्ती जमवली तरी कोणी चौकशीच्या भानगडीत पडत नाही.

अशी त्यांची कल्पना होती आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांची ही कल्पना खरीही होती. छगन भुजबळ यांच्यावर अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी भुजबळांचे काहीही वाकडे होत नव्हते. ते मंत्री असल्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय खटला भरता येत नव्हता आणि सरकार त्यांचेच असल्यामुळे खटल्याची अनुमती मिळत नव्हती. भुुजबळांनी कितीही वेड्यावाकड्या मार्गांनी अमाप संपत्ती कमावली आहे हे आता दिसत आहे. परंतु त्यांच्या पक्षाच्या सरकारने त्यांना सांभाळून घ्यायचे ठरवले होते. एका बाजूला हे सांभाळून घेणे सुरू असताना आपण एकही पैसा खाल्ला नाही असा आविर्भाव आणून भुजबळ ताठ मानेने वावरत होते. एवढेच नव्हे तर आपल्यावरच्या आरोपांची चौकशी झाली तरी एका पैशाचाही भ्रष्टाचार उघड होणार नाही अशी ग्वाही ते देत होते. असा सारा लपवाछपवीचा मामला असल्यामुळे त्यांचे सारे काळे व्यवहार पचले होते. परंतु अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाला भुजबळांवरील आरोपांचे गांभीर्य लक्षात आले.

त्यावर न्यायालयाने चौकशीचे आरोप दिले आणि त्यातून खटला उभा राहिला. मात्र खटला उभा राहीपर्यंत भुजबळ आपण स्वतः रामाचे अवतार आहोत अशा ढेकीत बोलत होते आणि वागत होते. त्यांचे त्या वेळेसचे बोलणे आठवले म्हणजे अशरक्षः हसू येते. इतके त्यांचे प्रामााणिकपणाचे दावे आता बनावट निघाले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी कमावलेल्या चार मालमत्ता या त्यांनी काही बिल्डरांच्या नावाने केलेल्या होत्या आणि ते बिल्डर याबाबतीत अनभिज्ञ होते. या सार्‍या प्रकाराच्या चौकशीतून या बोगस कंपन्या उघड झाल्या आहेत आणि भुजबळांचे पितळ अधिकच उघडे पडले आहे. भुजबळांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आणखी दोन नेते याच आरोपाच्या चक्रात अडकण्याची शक्यता किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. या दोघांची नावे सांगण्यास किरीट सोमय्यांनी नकार दिला असला तरी हे दोन नेते कोण याचा अंदाज सर्वांना आलेला आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणखी दोन नेत्यांचा प्रवास कारागृहाकडे होणार असल्याचे दिसायला लागले आहे. काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात भाषण करताना सध्या सरकारच्या सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधी आणि बेनामी मालमत्तांच्या विरोधी कारवाईची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिनदिक्कतपणे बेनामी मालमत्ता विकत घेणारे राजकीय नेते आणि व्यापारी प्रचंड हादरले आहेत.

Leave a Comment