उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र


अमेरिका, चीन, जपान आणि संयुक्त राष्ट्रे या सर्वांच्या दबावाला बळी न पडता उत्तर कोरियाचा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम जोमाने जारी आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दामध्ये जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली इत्यादी युरोपीयन देश गुंतलेले होते. परंतु तिसरे महायुध्द झाले तर मात्र त्यामध्ये आशियातील देश जास्त गुंतलेले असतील. कारण आशिया खंडात तणाव वाढत चाललेला आहे. पश्‍चिम आशिया, उत्तर आशिया, मध्य आशिया आणि दक्षिण आशिया अशा चार विभागात तणाव पसरत आहे. त्यातच उत्तर कोरियाच्या या आक्रमक चालीमुळे तणावात वाढ झालेली आहे. अशातच काल उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र तयार करून त्याची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे.

जगाच्या अण्वस्त्र युध्दाकडे होत असलेल्या वाटचालीत कोरियाचे हे क्षेपणास्त्र सर्वाधिक मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. उत्तर कोरिया अशा प्रकारच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि चाचणी घेणार नाही असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. परंतु या विश्‍वासाला तड गेला आहे. काल चाचणी केलेल्या क्षेपणास्त्राची ही चाचणी उत्तर कोरियाच्या आजपर्यंतच्या अशा क्षेपणास्त्रांमध्ये सर्वाधिक यशस्वी क्षेपणास्त्रांची चाचणी समजली जात आहे. सार्‍या जगावर हेरगिरी करणार्‍या अमेरिकेच्या उपग्रहांनी उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राचा अवकाशातून अंदाज घेतला असून या क्षेपणास्त्राचा आवाका काय असेल याचाही आदमास घेतला आहे. त्यांच्या मते हे क्षेपणास्त्र शक्तीशाली आहे.

या क्षेपणास्त्राचे नाव हॉसॉंग चौदा असे असून ते उत्तर कोरियातून अलास्कापर्यंत उड्डाण करू शकेल असा विश्‍वास हे अमेरिकेच्या या उपग्रहांनी व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाने याही पूर्वी काही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित केलेली होती. मात्र ही क्षेपणास्त्रे फारच कमी क्षमतेची होती. काल चाचणी घेतलेले क्षेपणास्त्र मात्र कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील महत्त्वाचे पाऊल ठरावे एवढे लांब पल्ल्याचे नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांच्या मते उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्रे जपान आणि दक्षिण कोरिया या दोन देशांना इशारा देण्यासाठी तयार केली आहेत. अमेरिकेने या क्षेपणास्त्राविषयी खेद व्यक्त केला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्तर कोरियाला यापेक्षा वेगळे आणि चांगले काहीतरी निर्माण करता आले असता असा टोमणा मारला आहे.

Leave a Comment