इस्रोचे मार्केटिंग


भारतीय अंतराळ संशोधन संघटन (इस्रो) या संस्थेने उपग्रह प्रक्षेपणाच्या व्यवसायामध्ये प्रचंड मोठी झेप घेतलेली आहे. १९९९ ते २०१७ अशा १८ वर्षांच्या कालावधीमध्ये इस्रोनेे भारताचे आणि परदेशांचे मिळून २०९ उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. जगातले या क्षेत्रात कार्यरत असलेले देश प्रामुख्याने स्वतःचेच उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत असतात. परंतु भारताच्या इस्रो संघटनेने या १८ वर्षाच्या कालावधीत अवकाशात सोडलेल्या उपग्रहापैकी बहुसंख्य उपग्रह हे परदेशातले होते. म्हणजे इस्रो ही संघटना म्हणजे केवळ भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या उपग्रहांना अवकाशात सोडण्याचे साधन नाही. तर प्रक्षेपणाचा व्यवसाय करणारी संघटना आहे.

त्यामुळेच इस्रोने अवकाशात सोडलेल्या २०९ उपग्रहांमध्ये २८ देशांचे उपग्रह आहेत. त्यामध्ये अमेरिका, जर्मनी आणि युरोपीयन स्पेस असोसिएशन यांचाही समावेश आहे. म्हणजे भारताच्या शास्त्रज्ञांनी केवळ अवकाश संशोधनातच उड्डाण केले आहे असे नाही तर उपग्रह प्रक्षेपणाच्या व्यवसायातसुध्दा झेप घेतलेली आहे. भारताला या व्यवसायामध्ये आता फार मागणी यायला लागली आहे. इस्रोचा हा व्यवसाय विभाग अँथ्रिक्स या यंत्रणेकडून नियंत्रित केला जातो आणि अँथ्रिक्सला आतापर्यंत ७६.५ दशलक्ष डॉलर एवढा व्यवसाय मिळालेला आहे. या पुढच्या काळामध्ये हे उत्पन्न आणखी वाढेल असा इस्रोच्या संचालकांचा विश्‍वास आहे.

तूर्तास तरी इस्रोच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ झालेली दिसली आहे. उपग्रह अवकाशात नेऊन सोडण्याची सेवा देऊन जसे आपल्याला पैसा मिळतो तसाच आता रॉकेट विक्रीचाही पैसा मिळण्याचा संभव निर्माण झाला आहे. याही बाबतीत गेल्या तीन वर्षांमध्ये इस्रोला मोठे यश मिळालेलेे आहे. अशा प्रकारचे रॉकेट विकसित करून दरवर्षी सहा ते आठ रॉकेटस् विकण्याचाही इस्रोचा विचार आहे. इस्रोला हे यश मिळण्यामागे संशोधनातले कठोर परिश्रम आहेत. विशेषतः पीएसएलव्ही या मालिकेतील रॉकेटांसाठी वापरले जाणारे इंधन भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातूनच विकसित झालेले आहे. हे रॉकेट विकसित करताना इस्रोने सॉलिड मोटार टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. २००७ सालपासून भारताने ही व्यावसायिक सेवा सुरू केली आणि दरवर्षी या सेवेची क्षमता १० टक्क्यांनी वाढवण्याचा इस्रोचा मानस आहे. क्षमता वाढवूनसुध्दा इस्रोचे प्रक्षेपणाचे दर जगातल्या अन्य देशातील दरांपेक्षा तुलनेने कमी आहेत हीही इस्रोची ही एक जमेची बाजू आहे.

Leave a Comment