मोदींची इस्रायल भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दौर्‍यावर आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. खरे म्हणजे तांत्रिक, संरक्षण विषयक आणि शेतीसाठी भारत आणि इस्रायल यांच्यात सहकार्य असण्याची फार गरज आहे. मात्र ही गरज असतानाही आजवर भारताचे कोणतेच पंतप्रधान कधी इस्रायलला गेलेले नाहीत. या मागचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे इस्रायलला भेट दिली की पॅलेस्टाईनमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देणे म्हणजे अरबस्तानातल्या पॅलेस्टाईनसहीत सर्व मुस्लीम राष्ट्रांची नाराजी ओढवून घेणे हेच होते. नरेंद्र मोदी यांना मात्र पॅलेस्टाईन किंवा इस्रायल विरोधी इस्लामी देशांच्या नाराजीची भीती नाही.

भारताच्या पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळी जेव्हा जेव्हा इस्रायल दौर्‍याची चर्चा झाली तेव्हा देशातले मुस्लीम मतदार सरकारवर नाराज होतील अशी भीती व्यक्त केली गेली. अशा भेटीतून अरबस्तानातील मुस्लीम देशही नाराज होतात आणि त्यांची ही नाराजी आपल्याला परवडणारी नव्हती. कारण हे सगळे देश केवळ इस्लामी देशच होते असे नाही तर भारताच्या निर्यात व्यापारातील मोठे ग्राहकसुध्दा होते. भारतातील धान्य, भाज्या, फळे यांची मोठी निर्यात या अरबी देशात होत असल्यामुळे त्यांना नाराज करून इस्रायलला भेट देणे काही आवश्यक नाही असा विचार आजवरच्या पंतप्रधानांनी केला.

नरेंद्र मोदी मात्र वेगळा विचार करत आहेत. कारण पॅलेस्टाईन किंवा अरबी देशांच्या नाराजीची त्यांना काही पर्वा नाही. भारतीय जनता पार्टी आणि रा. स्व. संघाचा परिवार याला इस्रायलचे भारी आकर्षण आहे. कारण इस्रायल हा ज्यूंचा देश नकाशावरून पुसला गेल्यानंतर २००० वर्षांनी पुन्हा निर्माण झाला आणि केवळ २५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशातून जगातल्या अनेक देशात शस्त्रास्त्रे रवाना होत असतात. इस्त्रायलची ही प्रखर राष्ट्रवादी भूमिका रा. स्व. संघाच्या परिवाराला आकृष्ट करणारीच आहे. म्हणूनही असेल पण नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौर्‍यावर जात आहेत. त्यांच्या या भेटीतून भारताच्या परराष्ट्र नीतीत होत असलेले मोठे परिवर्तन सूचित होत आहे. या परिवर्तनामध्ये जसा एक तत्वज्ञानाचा पैलू आहे तसाच त्याला तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे.

Leave a Comment