शेवटची मारधाड


जीएसटी कर प्रणाली सुरू होण्यास अजून ४८ तास बाकी आहेत पण या कराविषयी व्यापारी आणि उद्योगपतींमध्ये एवढी जिज्ञासा, अनिश्‍चितता आणि अज्ञानामुळे आलेली भीती दाटून आली आहे. या भीतंीने एवढे टोक गाठले आहे की, या सार्‍या भावनांपेक्षा जीएसटी लागू न झालेला बरा अशी त्यांची भावना झाली आहे. म्हणून काही लोकांनी शेवटच्या क्षणी न्यायालयात धाव घेऊन हा कर अजून पुढे ढकलला जातो का हे आजमावून पहायचे ठरवले आहे. खरे तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण आज काय किंवा उद्या काय कधी ना कधी हा कर लागू होणारच आहे. पण आपल्या देशात असेही काही लोक आहेत की ज्यांना कोणतीही नवी गोष्ट मानवतही नाही आणि ते नव्या गोष्टी आत्मसात करायला तयारही नसतात.

असे लोक पुढे आले की, काही राजकीय पक्ष त्यांच्या बाजूने उभे राहतात. खरे तर असे उभे राहणे हे मागे पडलेले पाऊल असते पण राजकीय नेत्यांना ती भाषा कळत नाही. चार लोक एकत्र येऊन काही तरी मागत आहेत आणि आपल्याला त्यांच्यात शिरकाव करून काही राजकीय लाभ मिळतो की नाही हे पाहिलेच पाहिजे असे त्यांना वाटत असते. अशा भूमिकेमुळे देशाचे पाऊल मागे पडते याचे त्यांना काही गम्य नसते. याही बाबतीत असे घडले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी जीएसटी कराची एवढी घाई कशाला असा प्रश्‍न विचारून आपली मनोवृत्ती दाखवून दिली आहे.

व्यापार्‍यांना जीएसटीची माहिती व्हावी यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले असूनही अनेक व्यापायी या बाबत अनभिज्ञ आहेत. एक जुलैपासून नेमके काय होणार याबाबत ते संभ्रमात आहेत. म्हणून ३० जूनपर्यंत आपल्या दुकानात असलेला सगळा माल संपवला पाहिजे अशी त्यांची घाई सुरू झाली आहे. या दोन दिवसांच्या काळात सगळा माल विकला जावा यासाठी त्यांनी आपला नफा कमी करून भलत्याच स्वस्तात सेल सुरू केला आहे. जीएसटी विषयीच्या अज्ञानातून असा पॅनिक सेल सगळ्याच शहरात सुरू झाला असल्याने बाजारात हीच एक मोठी बातमी ठरली आहे. अशा सेलमुळे ग्राहक खुष आहेत. खरे तर असा सेल लावण्याचे काहीही कारण नाही. जीएसटी लागू होणार म्हणजे असे काही भयंकर होणार नाही की त्यामुळे वैतागून असा वेड्यासारखा सेल लावण्याची घाई व्हावी. त्यांना वस्तुस्थिती समजेल तेव्हा आपण उगाच असा सेल लावला असा पश्‍चात्ताप त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Comment