काश्मीरमधील आग कधी विझणार?


रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लीम समाजाचे वर्तन अतीशय पवित्र राखले जाते. मात्र काश्मीरमध्ये ऐन रमजान सणाच्या दिवशीच हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या दोन दिवस आधी जमावाने एका मशिदीसमोर एका पोलीस अधिकार्‍यांची ठेचून हत्या केली होती. त्यामुळे त्या परिसरात अटक सत्र राबवण्यात आले आणि शांततेला गालबोट लागले. त्यामुळे पोलिसांनी मोकळ्या मैदानात नमाज पठण करण्यावर बंदी घातली. अशी बंदी असूनसुध्दा श्रीनगरमध्ये दोन ठिकाणी आणि अन्यत्र काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्या लोकांनी पोलिसांचे आदेश झुगारून नमाज पठण केले. श्रीनगरच्या मुख्य मैदानावर तर ५० हजार मुस्लीम भाविक एकत्र आलेले होते. अर्थात, त्यांनी पोलिसांचा आदेश मोडला असला तरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून फार मोठा हिंसाचार झाला नाही. परंतु अन्यत्र काही हिंसक घटना घडल्या आणि त्यात काही लोक जखमी झाले आणि गेल्या ३-४ दिवसातल्या शांततेला गालबोट लागलेच.

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पसरवणारे फुटीरतावादी नेते सध्या केंद्र सरकारच्या रडारवर असल्यामुळे त्यांचे पाठीराखे अस्वस्थ झाले आहेत. याना त्या प्रकाराने काश्मीरमध्ये शांतता नांदू नये असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातूनच हा हिंसाचार झाला. अनंतनागमध्ये हजारो मुस्लिमांनी मशिदीमध्ये नमाजपठण केले. परंतु ते प्रार्थना संपवून बाहेर आल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन अशा अस्वस्थ झालेल्या पाठिराख्यांनी तिथे हिंसाचारास सुरूवात केली. त्यात दहाजण जखमी झाले. सोपोर आणि पट्टण याही दोन ठिकाणी असाच प्रकार घडला. या सगळ्या घटना पाहिल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीरच्या शांततेबद्दल काही प्रश्‍न मनात दाटून येतात. थोड्याशाही चिथावणीने तिथे हिंसेची आग सहजपणे पसरू शकते. अशी तिथली स्थिती एवढी संवेदनशील झाली असेल तर ती सामान्य कधी होणार आणि काश्मीरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होणार असा प्रश्‍न पडू शकतो. काश्मीरच्या बाहेरील अन्य भारतीयांना काश्मीर प्रश्‍नातले सगळेच धागेदोरे माहीत नाहीत. त्यामुळे भारतीय जनतेच्या मनामध्ये सातत्याने एक प्रश्‍न निर्माण होतो की काश्मीरी जनता भारतात खुष नसेल तर सातत्याने आंदोलन करून ती पाकिस्तानमध्ये जाणार का? काश्मीर भारतात राहणार की नाही? या बाबतीत निःसंदिग्धपणे असे सांगावे लागेल की काश्मीर कोठेही जाणार नाही, जाऊ शकणार नाही. तेव्हा भारतीय जनतेने याबाबत निश्‍चिंत राहिले पाहिजे.

एका बाजूला ही निश्‍चिंतता शक्य आहेच पण दुसर्‍या बाजूला काश्मीरमधला हिंसाचार काही थांबायचे नाव घेत नाही. मग या हिंसाचाराचे उत्तर कशात आहे आणि ते शोधण्यासाठी आपले सरकार काय करत आहे? याही बाबत आपण निश्‍चिंत रहावे अशीच अवस्था आहे. मात्र काही वेळा दिशाभूल झालेले काही तरुण हातात दगड घेऊन लष्करावर दगडफेक करतात आणि परिस्थिती चिघळते. ती परिस्थिती आटोक्यात आणणे हे मोठे संवेदनशील काम असते. कारण ही दगडफेक लष्करावर होत असते. लष्कराच्या हातात बंदुका असतात परंतु लष्कर या बंदुका आपल्या शत्रूसाठी वापरत असते. लष्करातला कोणताही जवान आपल्या देशातल्या लोकांंकडून भिरकावले गेलेले चार-दोन दगड सहन करू शकतो. परंतु कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या देशवासीयांवर गोळी झाडत नसतो. त्याचा हा बाणा हीच त्याची मजबुरी ठरलेली आहे आणि दगडफेक करणार्‍या तरुणांना ती एक संधी ठरलेली आहे. या तरुणांची भडकवलेली माथी जोपर्यंत शांत होत नाहीत आणि त्यांची माथी भडकवणार्‍या फुटीरतावादी नेत्यांना जेरबंद केले जात नाही तोपर्यंत हा हिंसाचार आटोक्यात आणणे कठीण होते.

परिणामी, हा हिंसाचार बघून जनता अस्वस्थ होते. मात्र कंेंद्र सरकारने या प्रश्‍नाच्या मुळाला हात घालण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये असंतोष तेवत ठेवायचा आहे आणि त्यासाठी काही फुटीरतावादी नेत्यांना हाताशी धरून त्यांना पैसे देऊन काश्मीरमधली शांतता बिघडवलेली आहे. या फुटीरतावादी नेत्यांचे हातचे बाहुले बनलेल्या तरुणांना प्रबोधित करून त्यांना वस्तुस्थितीची जाणीव दिली तर काश्मीरमधला जनतेचा हिंसाचार नक्कीच थांबेल आणि तशी प्रक्रिया सुरू झालेली आहे. दुसर्‍या बाजूला पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. त्या दृष्टीने जून महिना त्यांना अनुकूल असतो. परंतु याच महिन्यात भारतीय सुरक्षा जवानांनी घुसखोरी करणार्‍या २५ दहशतवाद्यांना यमसदनास पाठवले आहे. आपले लष्कर त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यथायोग्यपणे पार पाडत आहे. परंतु जनतेलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. काश्मीरी जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. काही स्वयंसेवी संघटना तसे प्रयत्नही करत आहेत. १९६० आणि ७० च्या दशकामध्ये नागालँड, मिझोरम, मणिपूर या राज्यांमध्येही अशीच अवस्था होती. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संघटनांनी तिथे केलेल्या चिकाटीच्या कामामुळे तिथले चित्र बदलले आहे. जम्मूकाश्मीरमध्येही या वर्षी काही विद्यार्थीे अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. हे शुभचिन्ह आहे आणि याच मार्गाने तरुण वर्ग मुख्य प्रवाहात येऊन काश्मीरचे चित्र बदलणार आहे.

Leave a Comment