मार्केटिंग देशाचे


पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगाल आणि अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. पोर्तुगाल बरोबर त्यांच्या उपस्थितीत भारताचे काही व्यापारी करार झालेले आहेत. पण अमेरिकेत त्यांचा कार्यक्रम फार व्यापक होता. एक आंतरराष्ट्रीय बैठक त्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा, विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा आणि अमेरिकास्थित भारतीयांशी गप्पाटप्पा असा व्यापक कार्यक्रम घेऊन ते गेलेले होते. त्यांनी भारतीयांशी वार्तालाप करताना भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे, बदलत्या धोरणांचे आणि वेगाने विकसित होत असलेल्या अनुकूल वातावरणाचे चित्र उभे केले. पूर्वी पाकिस्तानने भारताच्या विरोधात कारवाया कराव्यात आणि आपण शांतीदुतासारख्या त्या कारवाया सहन कराव्यात अशी स्थिती असे परंतु आता मात्र भारताचे सीमेवरील जवान पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहेत आणि त्यामुळेच भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला जगभरातून पाठिंबा मिळाला, असे मोठे सूचक उद्गार नरेंद्र मोदी यांनी काढले. त्यांच्या या म्हणण्यात बरेच तथ्य आहे.

इतिहासावर नजर टाकल्यास हे लक्षात येते. पूर्वीच्या काळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चकमकी, दहशतवादी कारवाया याकडे अमेरिका आणि सारे जगच या दोन देशांच्या दरम्यानचा कायदा सुव्यवस्थेचा एक प्रश्‍न म्हणून पाहत असे. त्यामुळे अशा दहशतवादी कारवाया करू नयेत म्हणून अमेरिकेने पाकिस्तानवर कधीच दबाव आणला नाही. आता मात्र चित्र बदलले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा प्रश्‍न हा दोन देशांचा प्रश्‍न नसून जगभर वाढत चाललेल्या इस्लामीक दहशतवादाचाच तो एक भाग आहे. हे जगाने आता मान्य केले आहे. त्यामुळे या संदर्भात पाकिस्तानवर हळूहळू जगाचा दबाव येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर तो प्रत्यक्षात आणलेला आहे आणि चीनने पाकिस्तानला मदत देण्याच्या बाबतीत उदासीनता दाखवली आहे. म्हणजे भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या दहशतवादी कृत्यांकडे बघण्याचा या दोन महाशक्तींचा दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणूनच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला सगळ्या जगाने मूकसंमती तर दिलीच. पण कोणी विरोधही केला नाही. असाच दृष्टिकोन इराककडून पाकिस्तानकडे केल्या जाणार्‍या सर्जिकल स्ट्राईकच्याबाबतीतसुध्दा स्वीकारला गेला तर पाकिस्तानला एक दिवस आपल्या या कारवाया थांबवणे भाग पडेल आणि तो भारताच्या शांततापूर्ण धोरणाचाच परिपाक असेल.

या भारतीयांशी केलेल्या गप्पाटप्पांबरोबरच मोदींनी अमेरिकेत हाती घेतलेला एक कार्यक्रम म्हणजे उद्योगांशी केलेली चर्चा. देशात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी मोठे दीर्घ प्रयत्न करावे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे प्रयत्न न थकता आणि सातत्याने करत असतात. हे सारे जग बघत आहे. अशा प्रयत्नांमधून भारताची गुंतवणुकीला अनुकूल अशी प्रतिमा निर्माण करण्याचे काम करावे लागते. पंतप्रधानांनी विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी संवाद साधताना भारतात उद्योग उभारणे कसे सोपे होत चालले आहे याचा आढावा घेतला. हे काम सुलभ व्हावे यासाठी भारत सरकारने आजपर्यंत कायद्यात अनेक बदल केलेले आहेतच. परंतु अनेक प्रकारच्या प्रशासकीय सूचना आणि आदेश जारी केले आहेत. अशा आदेशांची आणि कायद्यांची संख्या ७ हजारांवर आहे. यावरून मोदी सरकारने परदेशी गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी कसे व्यापक प्रयत्न केलेले आहेत याचा अंदाज येतो. या सार्‍या प्रयत्नांचा आढावा त्यांनी या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमोर घेतला.

भारत सरकारने येत्या १ जुलैपासून जीएसटी कायदा लागू करण्याचे ठरवलेले आहे. भारताच्या इतिहासातला हा सर्वात मोठा, प्रभावी आणि व्यापक असा कर सुधारणा कार्यक्रम आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायाला कशी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे याचे चित्र नरेंद्र मोदी यांनी या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमोर उभे केले. त्यांची ही बैठक जवळपास दीड तास चाललेली होती आणि तिला अमेरिकेतील आघाडीच्या मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. गंमतीचा भाग असा की या सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमध्ये मुळात भारतीय असलेल्या लोकांचीच संख्या मोठी होती. कारण अमेरिकेतल्या अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे मुळात भारतीयच आहेत. म्हणजे अमेरिकेतील अर्थ व्यवहार किंवा उद्योग विश्‍व भारतीयांच्या नियंत्रणात आहे. गुगल, पेप्सीकोला इत्यादी कंपन्यांचा त्यात समावेश आहे. म्हणजे या लोकांच्या देशभक्तीला आवाहन केले तर हे सगळे प्रभावी अधिकारी त्यांच्या कंपनीची गुंतवणूक भारतात वाढवण्यास गती देतील. किंबहुना यातल्या काही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपल्या कंपनीची भारतातली गुंतवणूक वाढवण्याचे आश्‍वासनसुध्दा दिलेले आहे आणि भारत ही गुंतवणुकीस अनुकूल अशी भूमी आहे हे मान्य केले आहे. एकंदरीत नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिका दौरा भारताचे मार्केटिंग राजकीय आणि औद्योगिक अशा दोन्ही क्षेत्रात करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरला आहे.

Leave a Comment