फुकटचा हव्यास नडला


पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील भवालपूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शार्किया या गावाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका विचित्र अपघातात १५० लोकांचा अक्षरशः जळून कोळसा झाला. पेट्रोल भरून घेऊन निघालेल्या टँकरचा स्फोट झाल्यामुळे हे लोक मरण पावले. खरे म्हणजे या अपघाताला हे लोकच स्वतः जबाबदार होते. आपण आपल्या आयुष्यामध्ये काही सामान्य तत्वे पाळून जगत असतो. शाळेमध्ये आपल्यावर काही संस्कार केले जातात. घरातही काही संस्कार होतात. रस्त्यावर दुसर्‍याची एखादी वस्तू सापडली तर ती आपल्या खिशात घालू नये. जवळपास त्या वस्तूचा मालक कोणी असेल तर चौकशी करून ती सापडली असेल त्याला ती परत करावी. असा एक साधा संस्कार आपल्यावर केला जात असतो.

अशा संस्काराचा विसर पडला म्हणजे पाकिस्तानातल्या या दुर्घटनेसारखे अपघात घडतात. हा टँकर ५० हजार लीटर पेट्रोल घेऊन चाललेला होता. परंतु त्याच्या एका चाकातील टायर फुटले आणि टँकर बंद पडून कलता झाला. त्यामुळे त्यातून पेट्रोल हळूहळू बाहेर पडायला लागले. आसपास राहणार्‍या लोकांनी हे बघितले आणि जवळपास २०० ते ३०० लोक आपली वाहने आणि रिकाम्या बाटल्या घेऊन अपघातस्थळाकडे धावले. टँकरमधून गळत असलेले पेट्रोल आपल्या बाटल्यात आणि गाड्यांमध्ये भरून घेण्याची एकच झुंबड उडाली. मात्र आपण रस्त्यावरची जी वस्तू लुटत आहोत ती किती ज्वालाग्राही आहे याचे भान या लोकांना राहिले नाही.

एवढ्यातच कोणीतरी आपल्या खिशातला लायटर पेटवला. टँकरमधून वाहून रस्त्यावर सांडलेल्या पेट्रोलने त्यामुळे पेट घेतला आणि काही सेकंदांच्या आत ही पेट्रोलची आग टँकरपर्यंत जाऊन पोहोचली आणि टँकरला आग लागून त्याचा एवढा जबरदस्त स्फोट झाला की काही क्षणाच्या आत जवळपास १५० लोक जागेवरच जळून मरण पावले. त्यांच्या गाड्या जळाल्या आणि काही लोक गंभीररित्या होरपळले. वास्तविक पाहता रस्त्यावर वाया जात असलेले ते पेट्रोल आपले नव्हते. ते दुसर्‍याचे होते. त्यामुळे ते लुटून आपल्या घरी आणावे असे वाटणे हे पापच होते. मात्र सध्या लोक इतके स्वार्थी झाले आहेत की जी वस्तू आपली नाही ती आपण उचलता कामा नये इतकी नीतीमूल्य पाळण्याचे भान त्यांना राहिलेले नाही आणि या स्वार्थी भावनेतूनच हे लोक आपल्या आयुष्याला मुकले. सगळेच लोक पेट्रोल लुटत होते. त्यांना कोणीही प्रतिबंध करत नव्हते ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Leave a Comment