दोन टाईम झोन आवश्यक


भारत हा तसा जगातला सर्वात मोठा देश नाही. रशिया, अमेरिका, ब्राझील, चीन आणि रशिया हे देश भारतापेक्षा मोठे आहेत. तरीही भारत हा खंडप्राय देश आहे. मात्र अन्य मोठ्या देशांप्रमाणे भारताचे वेगळे टाईम झोन करण्यात आलेले नाहीत. त्यांची आवश्यकता मात्र आहे. कारण एवढ्या मोठ्या देशात एकच प्रमाणित वेळ असणे हे अनेक दृष्टीने गैरसोयीचे असते. आजवर त्यातून निर्माण झालेल्या गैरसोयींकडे कोणाचे लक्ष गेले नाही परंतु त्यामुळे मनुष्यबळ आणि पैसा त्याचबरोबर ऊर्जा या तीन गोष्टींचे मोठे नुकसान झालेले आहे. भारताच्या नागालँड, मणिपूर आदी ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सूर्योदय लवकर होतो आणि देशाच्या अन्य भागात तो उशिरा होतो. या विभिन्न वेळांमुळे दोन टाईम झोन वेगळे करण्याची गरज आहे.

देशाच्या अन्य भागांमध्ये सूर्योदय साधारणतः सकाळी सहाच्या सुमारास होतो. तेव्हा नागालँडमध्ये तो तासभर आधीच झालेला असतो. म्हणजे भारताच्या ईशान्य भागात पहाटे पाच वाजताच फटफटलेले असते. मात्र त्या भागातली सरकारच्या आणि विविध खात्यांच्या कार्यालयांची वेळ देशातल्या अन्य भागांप्रमाणेच सकाळी १० ची ठरवलेली असते. तिथला कार्यालयीन कर्मचारी सकाळी १० पर्यंत बराच कंटाळलेला असतो आणि त्याचे कार्यालय संध्याकाळी ६ वाजता संपते तेव्हा तिकडे बराच अंधार पडलेला असतो. त्यामुळे तो थकलेला असतो. कोणत्याही कार्यालयाच्या वेळा या सूर्य उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळांचा विचार करून ठरवलेल्या असतात.

तसा विचार केला तर ईशान्य भारतातील कार्यालयाच्या वेळा सकाळी ८ ते दुपारी ४ अशा करणे सोयीस्कर असते. मात्र त्या तशा नसल्यामुळे तिथल्या कर्मचार्‍यांकडून कमाल क्षमतेने काम होत नाही. शिवाय तिथल्या कार्यालयाची बंद होण्याची वेळ ही तिथे अंधार पडल्यानंतरची असल्यामुळे तिथल्या कार्यालयांमध्ये दिवे लावावे लागतात. त्यामुळे उर्जेचा व्यय होतो. या सगळ्यांचा विचार करून ईशान्य भारताला वेगळा टाईम झोन जाहीर करून तिथल्या सगळ्या वेळांची फेरआखणी करावी लागेल. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी असा वेगळा टाईम झोन जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव आशुतोष शर्मा यांनी पेमा खांडू यांच्या या सूचनेचा गांभिर्याने विचार केला जाईल आणि त्यातून भारतात दोन प्रमाणवेळा वेगळ्या जाहीर केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment