लोकसंख्येचे गणित


चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून याबाबतीत भारतचा दुसरा क्रमांक आहे. या दोन देशांच्या लोकसंख्या एवढ्या प्रचंड आहेत की पृथ्वीतलावरल्या कोणत्याही तीन माणसांमध्ये एक माणूस या दोन देशातला आहे. म्हणजे जगाची लोकसंख्या ७०० कोटी असेल तर चीन आणि भारत यांची लोकसंख्या म्हणून तिच्या एकतृतीयांश आहे. नेमके आकडे सांगायचे झाले तर चीनची लोकसंख्या जगाच्या १९ टक्के एवढी आहे तर भारताची लोकसंख्या १८ टक्के एवढी आहे. एक काळ असा होता की चीनची लोकसंंख्या ६० कोटी होती आणि भारताची लोकसंख्या ४० कोटी होती. त्या दिवसांतसुध्दा लोकसंख्येच बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला इंडोनेशिया किंवा रशिया यांची लोकसंख्या ४० कोटीपेक्षा कितीतरी कमी होती. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकात प्रचंड अंतर होते. तसेच चीन आणि भारत यांच्यातसुध्दा २० कोटींचा फरक होता. मात्र आता चीनने लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले आहे आणि भारताला अजून तेवढे यश मिळालेले नाही. त्यामुळे या दोन देशातले लोकसंख्येतले अंतर कमी झालेले आहे.

आता चीनची लोकसंख्या १४१ कोटी आणि भारताची लोकसंख्या १३४ कोटी आहे. म्हणजे या दोन देशांमध्ये केवळ ७ कोटीचे अंतर आहे. भारत हे अंतर कमी करून २०२४ साली चीनच्या पुढे जाईल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याविषयक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. लोकसंख्येचे असे आकडे वाचले म्हणजे साहजिकच चिंता वाटायला लागते. कारण भारत देशात १५० कोटी लोकांना दोन वेळचे अन्न देता येईल एवढी क्षमता आहे का असा प्रश्‍न विचारला जात आहे आणि अशाच रितीने लोकसंख्या भरमसाठी वाढत गेली तर एक दिवस ती एवढ्या टोकाला जाऊन पोहोचेल की लोक उपाशी मरायला लागतील, असे काही लोकांना वाटते. मात्र अशी चिंता करण्याचे काही कारण नाही. भारताची लोकसंख्या जेव्हा ६० कोटी झाली तेव्हा असाच प्रश्‍न विचारला गेला होता. लोकसंख्या ६० कोटींच्या पुढे गेल्यास त्यांना लागेल एवढे धान्य भारतात पिकेल का असा प्रश्‍न काही तज्ञ मंडळी विचारत असत. मात्र आता अशी अवस्था आहे की १३४ कोटी लोकांना पुरेल एवढे धान्य पिकून शिल्लक राहिले आहे आणि एकेकाळी धान्याची आयात करणारा भारत देश जगातल्या २२ देशांना धान्य निर्यात करत आहे. तेव्हा लोकसंख्या वाढली म्हणून चिंता व्यक्त करण्याचे काही कारण नाही.

मुळात लोकसंख्येचे हे सारे अंदाज खरे ठरतील का असा पहिला प्रश्‍न उपस्थित करता येऊ शकतो. मात्र हे अंदाज खरे ठरून देशाची लोकसंख्या २०० कोटीवर गेली तरीही आपली जमीन एवढी सक्षम आहे की ती २०० कोटी लोकांना लागेल एवढे धान्य पिकवू शकते. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकसंख्या ही काही सातत्याने वाढतच असते असे नाही. लोकसंख्येचा अभ्यास करणारे लोक अशी ग्वाही देत असतात की एका विशिष्ट आकड्यानंतर लोकसंख्या घटायला लागत असते. देशातल्या तरुणांची संख्या वाढली की काही वर्षे लोकसंख्या वाढत राहते आणि ती वाढणारी लोकसंख्या तरुणांची असते. या वाढीला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्याविषयक लाभांश असे म्हटले जाते. भारत देश सध्या या अवस्थेत आहे. त्यामुळे भारताची लोकसंख्या आगामी ३० वर्षे वाढत राहणार आहे. त्यानंतर मात्र ती कमी होत जाणार आहे. आता चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असूनसुध्दा भारत देश एक दिवस चीनची बरोबरी करणार आहे. कारण भारताची लोकसंख्या वाढण्याच्या स्थितीत आहे आणि चीनची लोकसंख्या स्थिर होऊन घटण्याकडे वळायला लागली आहे.

म्हणजे २०५० नंतर भारताच्या लोकसंख्येची अशी अवस्था येईल की लोकसंख्या घटत जाईल. जपान, अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, कॅनडा हे सगळे प्रगत देश सध्या लोकसंख्या घटण्याच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत. भारतासारख्या देशासमोर लोकसंख्या नियंत्रणात कशी राहील हा प्रश्‍न उभा आहे. पण वर उल्लेख केलेल्या प्रगत देशांसमोर लोकसंख्या कशी वाढेल हा प्रश्‍न उभा आहे. म्हणजे विकसनशील देशातला आणि विकसित देशातला लोकसंख्येचा प्रश्‍न परस्परविरोधी आहे. जो देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत होतो त्या देशाची लोकसंख्या आपोआपच कमी व्हायला लागते. ती परिस्थिती आता कॅनडात उद्भवली आहे. काही प्रगत देशात लोकांची जननक्षमता नष्ट होत चालली आहे. समृध्दी हे वरदान असले तरी त्या वरदानामध्ये जननक्षमता घटण्याचा एक शाप दडलेला असतो. जर्मनीमध्ये विशेषतः या गोष्टीची जाणीव होत आहे आणि ४० टक्के जर्मनांची प्रजननक्षमता शून्यावर आली असल्याने देशाची लोकसंख्या कशी वाढेल अशी चिंता लागून राहिली आहे. ही अवस्था कोणत्याही देशाच्या वाटचालीत कधीतरी येतेच. तशी ती भारताच्या वाटचालीत येईल. परंतु तोपर्यंत भारत हा जगातला मोठ्या लोकसंख्येचा दुसर्‍या क्रमांकाचा देश असला तरी तो सर्वाधिक तरुणांचा देश आहे. हे त्याचे वैशिष्ट्य ही त्याची जमेची बाजू ठरणार आहे.

Leave a Comment