नाशिकच्या प्रज्ञा पाटीलने रचला योगासनात विश्वविक्रम


नाशिक: योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योग प्रशिक्षिका तथा उद्योजिका प्रज्ञा पाटील यांनी सलग १०३ तास योगासने करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगात सर्वाधिक काळ योगासने करणाऱ्या पाटील यांची नोंद झाली आहे. त्यांनी योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असेल केले. याआधी महिलांमध्ये तामिळनाडूच्या के. पी. रचना यांच्या नावावर ५७ तास योगा करण्याचा विक्रम होता. त्याआधी कॅनडाच्या यास्मिन गो यांनी ३३ तासांचा विक्रम केला होता. तर पुरुषांमध्ये डॉ. व्ही. गणेशकरण यांनी सलग ६९ तास योगा करण्याचा विक्रम केला आहे. हे सर्व विक्रम प्रज्ञा पाटील यांनी मोडीत काढले.

योगामध्ये मानवाला पूर्ण बदलण्याची शक्ती आहे. त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १०० तास योगा करण्याचा संकल्प केला होता. १६ जून रोजी पहाटे साडे चार वाजता इगतपुरीस्थित रिसॉर्टच्या सभागृहात पाटील यांनी या उपक्रमाला सुरूवात केली. बैठक, शयन, विपरित शयन आदी स्थितीतील जवळपास २५ आसने त्या रात्र-दिवस करत होत्या. या काळात द्रव स्वरुपात अन्न ग्रहण करताना त्यांनी उपस्थितांशी फारसा संवाद साधला नाही. सततच्या जागरणामुळे चौथ्या दिवशी झोप येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. याच दिवशी त्यांचे योगगुरू विश्वासराव मंडलिक यांनी भेट घेऊन १०० ऐवजी १०१ तास योगासने करण्यास सुचविले. त्यानुसार मंगळवारी सकाळपर्यंत नेटाने १०३ तासाचा टप्पा गाठत त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Comment