भयावह बालगुन्हेगारी - Majha Paper

भयावह बालगुन्हेगारी


दोनच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन या शहरातल्या घरफोड्यांविषयी एक धक्कादायक माहिती दिली. या घरफोड्यांचा तपास लवकर लागत नव्हता कारण आरोपी सर्वस्वी नवे होते. नेहमीचे सराईत आणि माहितीतले आरोपी असले की तपास लागणे सोपे जाते पण नव्या प्रकारचे आरोपी पोलिसांच्या यादीवर आधीपासून नसल्याने त्यांना पकडणे अवघड जाते. तसे अवघड तपास करून आरोपी पकडले तेव्हा हे आरोपी १७ ते २० वर्षांचे असल्याचे आढळलेच पण त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. या आरोपींत काही उच्च शिक्षित मुले होती. एक जण तर एम बी ए झालेला होता. चैनीला पैसे मिळावेत म्हणून आपण या चोर्‍या करीत होतो असे या मुलांनी पोलिसांना सांगितले.

असाच प्रकार कर्नाटकातही आढळला. बंगळूर शहरात अशाचा चोर्‍या आणि घरफोड्या वाढल्या होत्या. तिथल्या पोलिसांनाही अशा चोर्‍यांत ही लहान मुले असल्याचे आढळले. मात्र एक प्रकार वेगळा होता. या गँगमध्ये सगळीच मुले अठरा वर्षांच्या आतली होती. पिंपवडप्रमाणे ही मुले स्वत:च्या नियोजनातून चोर्‍या करीत नव्हती तर त्यांना काही सराईत चोर या चोर्‍या करायला प्रवृत्त करीत होते. अशा कामासाठी ही मुले वापरली की, एकतर ती पटकन सापडत नाहीत आणि सापडली तरीही त्यांच्यावर बालगुन्हेगारांसाठीच्या न्यायालयात खटले भरले जाऊन काही महिन्यांपर्यंत रिमांड होममध्ये राहण्याची शिक्षा होऊन सुटका होते. त्यांना पुन्हा चोरी करण्यासाठी वापरता येते.

हीच मुले १८ वर्षांपेक्षा मोठी असती तर त्यांच्यावर सर्वसाधारण न्यायालयात खटला भरला जाऊन किमान पाच वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा झाली असती. या प्रकारात एक गोष्ट मात्र गंभीर आढळली की या मुलांना ा कामासाठी वापरताना त्यांचे हे सूत्रधार त्यांना झोपेच्या गोळ्या खायला देऊन त्यांच्या आहारी पाडतात. या गोळ्याचे व्यसन लागल्यामुळे ही मुले आपल्या कह्यात राहतात हा तर एक हेतू आहेच पण या गोळ्यांनी ही मुले स्वयं मोहित होतात आणि सांगेल ते काम करतात. अशा गोळ्यांनी या मुलांना अगदी बेकार करून टाकलेले होते असे पोलिसांना त्यांच्या तपासात आढळले. गुन्हेगारीच्या विश्‍वात काय चाललेले असते याची आपल्याला कल्पनाही नसते. पण जगात होणार्‍या बदलांचा वेध घेऊन हे लोक मोठ्या चातुर्याने या बदलाचा स्वीकार करतात आणि पोलिसांना चकित करून मोठ्या हुशारीने गुन्हे घडवतात.

Leave a Comment