जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक घेणार


नवी दिल्ली – केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना दिलासा देत नोटाबंदीनंतर या बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करण्याची परवानगी दिली आहे. आरबीआयकडे जमा झालेली रोकड जमा करण्यासाठी तसेच चलनबदल करण्यासाठी जिल्हा बँकांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा बँकांना नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांच्या कालावधीत स्वतःकडे जमा झालेल्या पाचशे व हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करता येतील, असे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. याशिवाय, बँका आणि टपाल कार्यालयानांदेखील ३० डिसेंबर, २०१६ पूर्वी जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण आधी या नोटा का जमा झाल्या नाहीत याचे स्पष्टीकरणदेखील मागितले जाणार आहे.

शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हा बँकांकडे रोकड नसल्याची बाब समोर आल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी १४ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बॅंकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. जिल्हा सहकारी बॅंकांना परवानगी दिल्यास त्या काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली होती.

महाराष्ट्रात शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी त्यानंतर राज्यातील जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या २२७० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून मिळाव्यात ही मागणी उचलून धरली होती.

Leave a Comment