भारतीयांवर कुटुंब कर


भारतात परदेशांतली गुंतवणूक वाढत आहे पण ही गुंतवणूक एका बाजूला विक्रमी होत असतानाच ती जॉब लेस झाली आहे. म्हणजे गुंतवणूक मोठी पण रोजगार निर्मिती कमी अशी अवस्था आली आहे आणि नोकर्‍याच निर्माण न झाल्यास तरुणांचे काय होणार हा प्रश्‍न सतावत आहे. तिकडे अमेरिकेत ट्रंपशाही आल्यामुळे तिथल्याही भारतीयांच्या नोकर्‍या कमी होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या व्यवसायाचे स्वरूप बदलल्यामुळे आधीच आपल्या देशातल्या लाखावर आय टी इंजिनियर्सच्या नोकर्‍यांवर गदा आली आहे. अशा वेळी आपल्याला दिलासा असतो तो आखातातल्या नोकर्‍यांचा. पण तिकडेही सततच्या अशांततेमुळे भारतीयांना नोकर्‍या करणे अवघड झाले आहे.

अशी सारी स्थिती गंभीर झाली असतानाच सौदी अरबस्तानात नोकर्‍यांच्या निमित्ताने गेलेल्या भारतीयांवर तिथल्या सरकारने कुटुंब कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी भारतात जीएसटी करांची सुरूवात होईल त्याच दिवशी अरबस्तानात भारतीयांवर फॅमिली टॅक्सची सुरूवात होईल. सौदी अरबस्तानात ४१ लाख भारतीय नोकर्‍या करतात. त्याच्यातल्या अनेकांनी आपल्या पत्नी आणि मुलांना तिकडे नेले आहे. त्यामुळे त्यांना कुटुंब सुख मिळण्याची सोय झाली खरी पण ती त्यांना महागात पडणार आहे. चौघांच्या कुटुंबाला तिथेे दरमहा साधारणत: ५ हजारावर रुपयांचा फॅमिली टॅक्स द्यावा लागणार आहे. या कराचा विचार करून काही भारतीयांनी आपल्या कुटुंबियांना भारतात परत पाठवले आहे.

सध्या आपल्या देशात खनिज तेलांच्या किंमती घसरलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला दिलासा मिळाला असला तरीही घसरलेल्या तेलांच्या किंमतींनी अरबस्तानातल्या तेल सम्राटांसमोर पैशांचे संकट उभे राहिले आहे. घटलेल्या या उत्पन्नाची भरपायी करण्यासाठी तिथल्या सरकारांनी हा कुटुंबकराचा पर्याय शोधला आहे. आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी करदात्यांनी आपण नोकरी करतो त्या कंपन्यांनीच हा कर भरावा अशी मागणी करायला सुरूवात केली आहे. अर्थात ज्या कंपन्यांना ही भारतीय चाकरमानी मंडळी आपल्या नोकरीत टिकणे गरजेचे वाटते त्या कंपन्यांनी या कर्मचार्‍यांवर पडणारा कराचा नवा भार आपल्या शिरावर घेण्याची तयारी केली आहे पण त्यामुळे फार कमी लोकांना दिलासा मिळाला असून बमहुसंख्य कामगार कर्मचारी या नव्या कराने वाकणार आहेत. त्यातले काही लोक भारतात कायमचे परत येण्याच्याही विचारात आहेत.

Leave a Comment