उद्योगपती बाबा रामदेव


आपल्या देशात धार्मिक स्थळांत प्रचंड संपत्ती आहे. अनेक साधू श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे शेकडो एकर जमिनी आहेत आणि अब्जांनी पैसा आहे. पण बाब रामदेव आणि श्री श्री रविशंकर या दोघांनी भक्तांच्या देणग्यांतून अशी मालमत्ता कमविण्यापेक्षा उद्योग करून पैसा कमावला आहे. योग आणि अध्यात्म या दोन्हींच्या प्रसारातून त्यांनी हा पैसा कमावला असून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. आपल्या देशात श्रीमंत देवस्थानांवर नेहमीच टीका होत असते पण ही देवस्थाने काही पुजार्‍यांच्या ताब्यात नाहीत तर ती सरकारच्या ताब्यात आहेत. तेव्हा तिथल्या संपत्तीचा विनियोग गरिबांसाठी केला जावा असा उपदेश करणारांनी तो उपदेश सरकारला केला पाहिजे. या पैशांचा विनियोग गरिबांसाठी होत नाही या बद्दल पुजार्‍यांवर टीका करण्याचे काही प्रयोजन नाही.

दक्षिण भारतातल्या विविध राज्य सरकारांचे सुमारे एक लाख मंदिरांवर आणि त्या मंदिरांच्या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर नियंत्रण आहे. ही राज्य सरकारे या उत्पन्नातून मंदिरांचा कारभार तर चालवतातच पण त्यापेक्षा इतर कामांसाठीही या पैशाचा विनियोग करतात. तो वापर धर्माला अपेक्षित असा नाही. बाबा रामदेव यांच्या संपत्तीचे स्वरूप मात्र वेगळे आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या व्यवसायाने २०१६-१७ या आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची मर्यादा ओलांडली आहे. या बाबतीत पतंजलीचा देशात दुसरा क्रमांक आहे. ३० हजार ७८२ कोटी रुपये उलाढालीची हिंदुस्थान लिव्हर ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. पण पतंजली आयुर्वेदाने याबाबत नेसले (९ हजार १५९ कोटी) आणि इंडियन टोबॅको कंपनी (१० हजार ३३६ कोटी) यांना मागे टाकले आहे.

फास्ट मुव्हिंग कन्झुमर्स गुडस् क्षेत्रातली कंपनी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी असे समीकरण होते. बाबांनी त्यांची या क्षेत्रातली मक्तेदारी मोडून काढली आहे. यातल्या काही मालांच्या विक्रीत पतंजली अग्रेसर आहे. टूथपेस्टच्या बाजारात कोलगेट आघाडीवर असल्याचे मानले जाते पण रामदेव बाबांच्या दंतकांतीनेही आता १४ टक्के मार्केट शेअर मिळवलेला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात पतंजलीची उलाढाल दुप्पट करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. पतंजलीने आजवर केलेली प्रगती पाहता हे अशक्य वाटत नाही. पतंजलीने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १०० टक्के तर २०१७-१८ मध्ये कंपनीने ७० टक्के वाढ नोंदली तरी एकूण उत्पन्न १७ हजार कोटी रुपयांवर जाऊ शकते. अशा रितीने मार्च २०१८ नंतर बाबा रामदेव हे १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या अब्जाधीशांच्या श्रेणीत जाऊन बसू शकतात.

Leave a Comment