संशयास्पद नेटवर्क


लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय फोन कॉल करण्याची सुविधा असलेले विनिमय केन्द्र अवैधरित्या सुरू असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारची दोन केन्द्रे सुरू होती आणि त्यांचा संबंध हैदराबादच्या एका व्यक्तीशी होता. या बाबत आता काही लोकांना अटक झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या केन्द्राचा सुगावा आधी आपल्या लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला लागला. नंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. या विनिमय केन्द्रातून स्वस्तात कॉल करता येत होते म्हणून काही व्यापारी आणि दलालांनी त्याचा लाभ घेतला आणि आपले व्यवहार या अवैध माध्यमातून केला असे आढळले आहे.

पण एकदा अशी काही सेवा उपलब्ध होत आहे आणि पोलिसांना चुकवून तिच्यातून कॉल करता येतात असे दिसायला लागले की, तिचा फायदा अतिरेकी संघटनांकडून घेतला जाण्याची शक्यता असते. आता त्या दिशेने चौकशी केली जात आहे. तूर्तास तरी ही सेवा बहाल करणारांनी आपण दहशतवादी संघटनांना बळ दिले नसल्याचे म्हटले आहे. केवळ पैशाच्या लोभाने आपण हा उपद्व्याप केला असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. तरीही तपास यंत्रणा सावधपणे चौकशी करीत आहेत. कारण ही सेवा देणारे लोक दहशतवाद्यांचे हस्तक नसले तरीही ते त्यांच्या नकळत दहशतवाद्यांना सहायभूत ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण इसिस सारख्या संघटना तसा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात बरेच यश मिळवलेले आहे.

अशा प्रकरणात तपास यंत्रणाही बर्‍याच चाचपडत असतात. कारण सारा प्रकार नवा आहे. या तंत्रज्ञानाची माहिती असलेले कसलेले तंत्रज्ञ अशी कारस्थाने करतात आणि तंत्रज्ञानात होणारे बदल फार वेगाने आत्मसात करतात. त्या मानाने सरकारी तपास यंंत्रणांतल्या तपास अधिकार्‍यांना ही नवी तंत्रज्ञाने आणि त्यात होणारे बदल म्हणावे तेवढ्या वेगाने आत्मसात करता येत नाहीत. कारण त्यासाठी त्यांना सरकारी कामकाजाच्या पद्धतीनेच पुढे जावे लागते. मग अशा कारस्थानांचा तपास करताना त्यातले आरोपी तपास करणारांना सहजतेने चकवू शकतात. काही दहशतवादी संघटना तर या बाबतीत फार आघाडीवर असतात कारण जगभरातले उच्चशिक्षित तरुणही दहशतवादी संघटनांत सहभागी होत आहेत. या तरुणांची पोच लातूरपर्यंत असणे काही अशक्य नाही. मागे याच जिल्ह्यात उदगीर येथे अशाच एका हस्तकाने एसटीडी सेंेटरच्या माध्यमातून काम केले असल्याचे आढळले होते.

Leave a Comment