अभियांत्रिकीत मंदी


आपल्या देशातल्या शिक्षणामध्ये नेहमीच झुंडीने निर्णय घेतले जातात. एखाद्या अभ्यासक्रमाला एकदमच मोठी मागणी निर्माण होते आणि कालांतराने त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळेनाशा झाल्या की त्या अभ्यासक्रमांकडे असलेला ओढा कमी होतो. अभियांत्रिकीच्या बाबतीत तरी सध्या अशी मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. २०१६-१७ या वर्षामध्ये देशातल्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हजारो जागा रिकाम्या राहिल्या होत्या. यंदा बारावीचा निकाल लागून बरेच दिवस झाले पण अजूनही म्हणावे तसे प्रवेश घेतले जातील की नाही या शंकेने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांना घेरले आहे.

खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या बाबतीत कर्नाटक फार प्रसिध्द आहे. तिथल्या महाविद्यालयांनी यावर्षी स्वतःहूनच फीमध्ये जवळपास ७० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. काही महाविद्यालयांना भरपूर प्रवेश येतील अशी अपेक्षा आहे. म्हणून त्यांनी शुल्कात काही फरक केलेला नाही. मात्र काही महाविद्यालयांनी कमीजास्त प्रमाणात शुल्कात कपात केलेली आहे. कर्नाटकात अभियांत्रिकीच्या एकूण १ लाख ८० हजार जागा आहेत आणि त्यांना सरकारने १ लाख २१ हजारांपासून १ लाख ७० हजारांपर्यंत फी आकारण्याची अनुमती दिलेली आहे. गतवर्षीपर्यंत ही महाविद्यालये हे शुल्क वसूलही करत होती. पण यंदा त्यांनी ५० हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे मुलांचा असलेला ओढा हा केवळ अभ्याासक्रमावर अवलंबून नाही तर त्या महाविद्यालयातल्या पायाभूत सोयी आणि सवलती यावर अवलंबून आहेत. त्याचबरोबर त्या महाविद्यालयातून किती विद्यार्थ्यांना नोकर्‍या लागतात यावरही प्रवेश अवलंबून असतो. असे असले तरी साधारणपणे या वर्षी माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी या दोन शाखांकडचा मुलांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे या दोन शाखांच्या महाविद्यालयांनी फीमध्ये मोठी कपात केली आहे. मुले प्रवेश घेताना त्या महाविद्यालयातला प्राध्यापक वर्ग कसा आहे याचाही विचार करतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. महाराष्ट्रात अजून तरी अभियांत्रिकी महाविद्यालयांवर शुल्क कमी करण्याची आपत्ती आलेली नाही. परंतु प्रवेशाच्या बाबतीत अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही महाविद्यालयांनी शुल्कातली कपात स्वतः जाहीर केलेली नाही. परंतु ऐन प्रवेशाच्यावेळी घासाघीस करून फी कमी केली जाते. काही विद्यार्थ्यांना तर सगळीच्या सगळी ट्यूशन फी माफ केली जाते.

Leave a Comment